जळगाव (क्राइम दुनिया न्युज नेटवर्क) : पुणे येथे कॅब चालक म्हणून काम करणारा आकाश धनगर जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर येथील मुळ रहिवासी होता. तो अधुमनधून त्याच्या गावी मुक्ताईनगर येथे येत होता. गेल्या दिड वर्षापासून ओला, उबेर रॅपीडो या वाहनांवर चालकाचे काम करुन आकाश उदरनिर्वाह करत होता. गावी मुक्ताईनगर येथे त्याचा लहान भाऊ ऋषिकेश आई वडिलांसह रहात होता.

आकाशचा लहान भाऊ ऋषिकेश याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. त्या महिलेची मुलगी लग्नायोग्य झाली होती. त्या महिलेची मुलगी वयात आली असून लग्नायोग्य असल्याचे आकाशला समजले. त्यामुळे त्या मुलीसोबत ओळख परिचय करुन घेण्याची आकाशला उत्सुकता लागली होती. एनकेन प्रकारे आकाशने त्या महिलेच्या मुलीसोबत ओळख करुनच घेतली. आकाशला ती मुलगी खुप आवडली. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला. “लव्ह अॅट फर्स्ट साईट” आणि “सुंदरा मनात भरली” अशी त्याच्या मनाची गत झाली. तिच्यासाठी काय करु आणि काय नाही असे त्याला वाटत होते. तिच्यासाठी बोलण्यासाठी त्याचे मन अधीर होत असे. तिच्यासाठी बोलण्यासाठी त्याला धीर रहात नव्हता.
सुरुवातीला दोघे एकमेकांना चोरुन लपून गावात भेटू लागले. मुंबईच्या समुद्र किनारी ज्याप्रमाणे प्रेमी युगुल तासनतास सोबत बसून असतात त्याप्रमाणे ते एकमेकांना चोरुन लपून भेटले म्हणजे बराच वेळ गप्पा करत बसू लागले. वयात आलेली ती मुलगी देखील आकाशला प्रतिसाद देत होती. त्यामुळे आकाशच्या मनाची कळी आणि गालावरची खळी खुलत होती. काही दिवसांनी आकाश तिच्या घरी देखील काही ना काही बहाणा करुन जावू लागला. दोघांनी एकमेकांवरील प्रेम जाहीर केले. दोघांच्या घरी एकमेकांचे प्रेम माहिती झाले.

मी लग्न करेन तर या मुलीसोबतच अन्यथा नाही अशी आर्त विनवणी आकाशने घरात आई वडीलांकडे केली होती. त्यामुळे दोघा परिवारात एक बैठक झाली. त्या बैठकीत दोघांच्या विवाहाला सहमती दर्शवण्यात आली. दोघा परिवारात दोघांच्या विवाहाला सहमती भेटल्यामुळे दोघांना चोरुन लपून भेटण्याची गरज राहिली नाही. दोघे राजी खुशीने खुल्लमखुल्ला एकमेकांना भेटू लागले, बोलू लागले. आकाश तिच्या घरी उघड उघड जावू लागला. सुमारे दिड वर्षापुर्वी आकाश आणि त्या मुलीचा साखरपुडा झाला.

कामानिमीत्त आकाश पुणे येथे रहात होता. या कलीयुगात प्रत्येकाच्या खिशात अॅंड्राईड मोबाइल असल्यामुळे जग प्रत्येकाच्या मुठी सामावले आहे. कुणी कितीही लांब असला तरी मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येण्यास वेळ लागत नाही. आकाश आणि त्याच्या भावी पत्नीच्या रुपातील ती तरुणी असे दोघे मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात रहात होते. आकाश पुणे येथे असला तरी त्याचा तिच्यासोबत मोबाईलवर संपर्क सुरु होता. साखरपुड्यानंतर ती तरुणी तिच्या आईसह पुणे येथे आकाशकडे ये जा करत होती. आकाश व त्याचा परिवार देखील तिच्याकडे ये जा करत होता.
आजकाल मोबाईल ही चैनीची वस्तू नसून गरजेची वस्तू झाली आहे. मात्र मोबाईलचा योग्य वापर करायचा की गैरवापर करायचा हे व्यक्ती परत्वे ठरत असते. मोबाईल वापरामुळे जसे फायदे होतात तसे तोटे देखील होतात. मोबाईलमुळे कित्येक संसार दुभंगले आहेत हे वास्तव आहे. आपल्या भावी पत्नीचे काही तरुणांसोबत मोबाईलवर सातत्याने संभाषण होत असल्याचा संशय आकाशला येवू लागला. त्या संशयातून तो काही महिन्यांपुर्वी पुणे येथून मुक्ताईनगरला आला. ती दडपणाखाली राहण्यासाठी तो तिच्या घरी मुक्कामी गेला. ती निद्रावस्थेत असतांना तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्याचा उपदव्याप त्याने केला. तो व्हिडीओ त्याने तिच्या जवळच्या नातेवाईकांना पाठवला. त्यातून तिची बदनामी झाली आणि तिचे बाहेर फिरणे कठीण झाले. अशा प्रकारे तिच्या बाहेर फिरण्यावर त्याने चुकीच्या मार्गाने अंकुश लावला. मात्र त्याच्या या कारनाम्यामुळे त्याचा व तिचा साखरपुडा मोडला. काही दिवस दोघातील बोलणे बंद झाले.




काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर आकाशलाच राहवले नाही. तो पुन्हा तिच्यासोबत मोबाईलवर संपर्क साधू लागला. पुन्हा दोघातील विस्कटलेली प्रेमाची घडी व्यवस्थित झाली. त्यामुळे तिच्या परिवारातील सदस्य झाले गेले विसरुन दोघांच्या लग्नाला सहमत झाले. मात्र आकाशच्या घरातील सदस्य त्याच्या व तिच्या लग्नाला असहमत झाले. मात्र मी लग्न करेन तर तिच्यासोबतच अशी भुमिका आकाशने घेतली. त्यामुळे झाले गेले गंगेला मिळाले आणि पुन्हा दोघातील संबंध पहिल्यासारखे झाले.
काही दिवसांनी तो पुन्हा तिच्यावर शंका घेऊ लागला. त्याचे कारण म्हणजे रात्री उशीरापर्यंत ती त्याला मोबाईलवर ऑनलाईन दिसू लागली. गावातील विशाल गोसावी या तरुणाची आणि तिची व्हाटस अॅप वरील लास्ट सिनची वेळ त्याला एक सारखी दिसू लागली. दोघांचे व्हाटस अॅप चॅट सारख्या वेळेत त्याला दिसू लागले. त्यामुळे दोघे एकमेकांसोबत बोलत असल्याचा आकाशला संशय येवू लागला. त्या संशयातून आकाशने विशाल गोसावी याच्यासोबत काही ना काही कारणावरुन फोनवर बोलण्याचा सपाटा लावला.




21 नोव्हेंबर 2025 रोजी आकाशने विशालसोबत संपर्क साधला. ठरल्यानुसार रात्री अकराच्या सुमारास आकाश धनगर आणि त्याचा भाऊ ऋषिकेश धनगर हे दोघे जण विशाल गोसावी यास मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात भेटले. तिघांनी मिळून मद्यपानाची पार्टी करण्याचे नियोजन केले. रात्रीचे अकरा वाजल्यामुळे मद्य कुठे मिळेल या शोधात तिघे जण होते. चारचाकीने तिघे जण खामखेडा परिसरातील एका हॉटेलमधे गेले. त्याठिकाणी त्यांना मद्य मिळाले. एका रिकाम्या प्लॉट मधे तिघांनी मद्यपानाचा आस्वाद घेतला. मद्यपानानंतर दोघा भावांनी मिळून विशाल गोसावी यास चिखली घोडसगाव परिसरातील एका ढाब्यावर जेवण करण्यास नेले. जेवण झाल्यानंतर मद्याच्या नशेतील आकाश गाडीतच झोपी गेला. अशा प्रकारे विशाल गोसावीसोबत संपर्क वाढवून आकाशला त्याच्या मनातील संशय तपासून बघायचा होता.
दुस-या दिवशी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी आकाशला जाग आली. आपण आपल्याच गाडीत विशाल आणि ऋषिकेश सोबत नविन मुक्ताई मंदीर परिसरात असल्याचे त्याच्या लक्षात आले. सकाळी साडे सात वाजता विशाल गोसावी याला आकाशने मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात सोडून दिले. त्यानंतर दोघे भाऊ आपापल्या घरी परत आले.

विशाल गोसावी आणी आपल्या भावी पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आकाशला स्वस्थ बसू देत नव्हता. त्या संशयातून विशालचा खात्मा करण्याचे आकाशने मनाशी निश्चित केले होते. त्या संशयातून आकाशने विशालसोबत संपर्क वाढवला होता. 22 नोव्हेंबर 2025 रोजी आकाशने विशालसोबत पुन्हा संपर्क साधला. आज आपण पुन्हा मद्यपान करण्यासाठी बसू अशी आकाशने विशाल यास ऑफर दिली. ठरल्यानुसार दुपारी एक वाजेनंतर आकाश, त्याचा भाऊ ऋषिकेश आणि विशाल गोसावी असे तिघे जण पुन्हा मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकात एकत्र भेटले.
सुरुवातीला तिघांनी शिरसाळा येथील मारुती मंदीरात मारुतीच्या दर्शनाला जाण्याचे निश्चित केले. त्यानंतर दुपारी एका वाईन शॉपवरुन त्यांनी मद्य विकत घेतले. बोदवड रस्त्यावरील तलावाच्या दिशेने तिघे जण मद्यप्राशन करण्यासाठी गेले. त्याठिकाणी मद्याचे घोट रिचवल्यानंतर ते पुन्हा गावात परत आले. आज विशाल गोसावी याला या जगातून कायमचे रवाना करण्याचे आकाशने मनाशी निश्चित केले होते. त्या दृष्टीने त्याचे नियोजन सुरु होते. आकाशच्या मनात काय सुरु आहे याची विशाल यास भनक देखील नव्हती.
आकाश गाडीतच बसून असतांना ऋषिकेश आणि विशाल हे दोघे जण पुन्हा मद्य विकत घेण्यासाठी दुकानात गेले. त्यानंतर बस स्थानक परिसरातील दुकानावरुन मद्यासोबत खाण्यासाठी पदार्थ घेण्यासाठी दोघे गेले असतांना संधी साधून आकाशने एका दुकानावरुन चाकू विकत घेतला. पुन्हा एकवेळ मद्यप्राशनाची धुंदी चढण्याच्या तयारीने तिघे जण मुक्ताई मंदीरानजीक आर आर कॉलनीच्या बगिच्यात गेले. त्याठिकाणी तिघांचे मद्यप्राशन सुरु झाले.
यावेळी मद्याची ब-यापैकी धुंदी चढल्यानंतर त्या धुंदीचा फायदा घेत आकाशने विशाल यास थेट प्रश्न विचारला की तु माझ्या भावी पत्नीसोबत फोनवर का बोलतो. त्यावर विशालने आकाशला म्हटले की मी तिच्याशी फोनवर बोलत नाही. त्यानंतर दोघात शाब्दिक वादाला सुरुवात झाली. शब्दामागे शब्द वाढत गेला. विशाल गोसावी यास काही कळण्याच्या आत आकाशने त्याच्या पॅंटच्या मागील खिशात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढला. पुढील क्षणी आकाशने विशालच्या गळ्यावर चाकूचा वार केला. त्यानंतर लागलीच आकाशने विशालच्या गळ्यावर दुसरा वार केला.
दुस-या चाकू हल्ल्यात आकाशच्या हातातील चाकू खाली पडला. पडलेला चाकू ऋषिकेशने उचलला. ऋषिकेशने त्या चाकूने विशालच्या पोटावर वार केला. तिनवेळा चाकूचे वार झाल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. या सर्व घडामोडीत जखमी विशालच्या रक्ताचे डाग दोघा भावांच्या अंगावरील कपड्यांवर पडले. तसेच जखमी विशालचा मोबाईल फोन दोघा भावांनी फोडून तेथेच फेकून दिला.
रक्ताने भरलेले कपडे बदलणे गरजेचे असल्याची जाणीव दोघांना झाली. दोघांनी त्यांचे काका शांताराम धनगर यांना फोन करुन चांगले कपडे कोथळी या गावी घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार काका शांताराम धनगर यांनी दोघा पुतण्यांसाठी कपडे आणले. धावत्या गाडीतच सालाबर्डी नजीक दोघांनी कपडे बदलले. वाटेत अंगावरील रक्ताने भरलेले कपडे त्यांनी जाळून टाकले.
त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात दोघे घरी गेले. या दिवशी आकाशच्या भावी पत्नीचा वाढदिवस होता. त्यासाठी आकाशने तिच्यासाठी गिफ्ट आणि केक विकत घेतला. तिच्या आजीकडे तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर संधी साधून दोघांनी त्यांचे काका शांताराम धनगर यांना आम्ही विशालचा खून केला असल्याचे सांगितले.
दिनांक 22 नोव्हेंबरच्या दुपारपासून विशाल गोसावी त्याच्या घरातील सदस्यांच्या संपर्कात नव्हता. दुसरा दिवस उजाडला तरी विशाल घरी आला नाही. त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली. या मिसींगचा तपास हे.कॉ. महेंद्र सुरवाडे यांच्याकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे तपास करत होते.
या मिसींगच्या अधिक तपासात विशालचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. 22 नोव्हेंबरच्या दुपारपासून तो घरातून बाहेर गेला होता. 23 नोव्हेंबर पर्यंत देखील तो परत आला नव्हता. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुक्ताईनगर परिसरातील जैस्वाल लॉन्स येत होते. त्या परिसरात त्याचा शोध घेतला असता तेथे देखील त्याचा तपास लागला नाही. मात्र 22 नोव्हेंबरच्या सायंकाळी त्याच्यासोबत आकाश धनगर आणि ऋषिकेश धनगर हे दोघे भाऊ असल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. हा धागा हेरुन दोघांना चौकशीकामी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. दोघांना पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. दोघांची सखोल चौकशी करण्यात आली.
सुरुवातीला आकाश धनगर याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या करड्या आवाजापुढे आकाशचा आवाज सौम्य झाला आणि त्याने आपला गुन्हा कबुल करण्यास सुरुवात केली. आकाश याने कबुल केले की आपला गावातील एका तरुणीसोबत साखरपुडा झाला होता. त्याच तरुणीसोबत विशाल गोसावी याचे अफेअर सुरु असल्याचा आपल्याला संशय होता. त्या संशयातून आपण भाऊ ऋषिकेश याच्या मदतीने चाकू हल्ला करुन विशालचा खून केल्याचे कबुल केले. या खूनाचा सर्व घटनाक्रम आकाशने पोलिसांना कथन केला.
लागलीच या प्रकरणी न्याय वैद्यक पथक पाचारण करुन घटनास्थळाला भेट देण्यात आली. पोलिस उप अधिक्षक सुभाष ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ आदींनी आपापल्या पथकासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळ पंचनामा, मृतदेहाचा पंचनामा आदी सोपास्कार पार पाडण्यात आले. घटनास्थळावरील आर आर कॉलनीच्या बंद पडलेल्या बगीच्यात विशाल गणेशगिर गोसावी याचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. घटनास्थळावर रक्ताने माखलेला चाकू, रक्ताचे डाग व मद्याच्या बाटल्या आदी वस्तू आढळून आल्या.
विशालच्या बेपत्ता झाल्या प्रकरणी 88/2025 या क्रमांकाने दाखल मिसींगचा तपास करणारे हेड कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे यांनी या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत खूनाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला या घटनेप्रकरणी आकाश धनगर आणि ऋषिकेश धनगर या दोघा भावांविरुद्ध गु.र.न. 385/25 भारतीय न्याय संहिता कलम 103[1], 3[5] प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपासात या दोघांचे काका शांताराम धनगर यांचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक नयन पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप अधिक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक नयन पाटील करत आहेत. त्यांना सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे, जयेश पाटील, हेड कॉन्स्टेबल चेतन महाजन, रविंद्र धनगर, महेंद्र सुरवाडे, गोविंद पवार, पोलिस नाईक मोतीलाल बोरसे, गोविंद सुरवाडे व फॉरेंसिक पथकाचे सहकार्य लाभत आहे.







