जळगाव : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी तसेच ई-चलनाशी संबंधित विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्याचा फायदा घेत काही फसवणूक करणारे बनावट वेबसाइट्स, बनावट मोबाईल ॲप्स (APKs), आणि संशयास्पद लिंकद्वारे नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाढत्या प्रकाराबाबत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
“आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी” आणि अनधिकृत पेमेंट लिंक पाठवणे.
वाहन चालविण्याचा परवाना (“DL”) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश पाठवणे.
“RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावाच्या अनधिकृत APK ॲप्स/फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे. अशा प्रकारे फसवणूक करणारे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढतात
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, “अनधिकृत लिंक आणि फर्जी APK अॅप्सद्वारे OTP, बँक माहिती व मोबाईलमधील संवेदनशील डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये.” विभागाने स्पष्ट केले आहे की RTO कार्यालय अथवा परिवहन विभाग कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठवत नाही.
नागरिकांनी केवळ gov.in ने समाप्त होणारे अधिकृत संकेतस्थळ ज्यात वाहन नोंदणी (VAHAN) : vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) : sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा : parivahan.gov.in, ई-चलन पोर्टल : echallan.parivahan.gov.in यांचा वापर करावा. तसेच com, online, site, in अशा डोमेनवरील कोणतेही संकेतस्थळ उघडू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास National Cyber Crime Portal ( https://www.cybercrime.gov.in ), सायबर फसवणूक हेल्पलाईन 1930 किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. वर्मा प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



