जळगाव – आपल्याच कर्मचाऱ्यास त्याच्या आश्वसित प्रगती योजनेचा हप्ता व वेतन निश्चितीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या अमळनेर पालिका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मनोज साहेबराव निकुंभ असे या लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अमळनेर येथील पालिका कर्मचा-याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने मनोज निकुंभ या कर्मचाऱ्याची भेट घेतली. मनोज निकुंभ याने तक्रारदार कर्मचाऱ्याकडे दोन हजार रुपयांची मागणी करत मुख्याधिकाऱ्यांकडून मंजूर करून आणतो असे सांगितले.
याबाबत तक्रारदार कर्मचाऱ्याने 21 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर निकुंभ यांनी लाच घेतली नाही. मात्र रेकॉर्डरमध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस मनोज निकुंभ याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली. जिल्हा व सत्र न्या. एल. डी. गायकवाड यांनी त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.



