दोन हजाराची लाच घेतांना वायरमन रंगेहाथ अडकला सापळ्यात

On: December 15, 2025 8:16 PM

जळगाव – नवीन वीज मिटर घेण्यासाठी अगोदर चार हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर पुन्हा दोन हजार रुपये लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला. आत्माराम धना लोंढे असे जळगाव शहर उप विभागातील  वरिष्ठ तंत्रज्ञाचे (वायरमन) नाव आहे. जळगाव एसीबीच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या लाच प्रकरणातील तक्रारदार हे डॉक्टरचे वडील आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर घेण्यासाठी वायरमन लोंढे यांची भेट घेत लागणाऱ्या कागदपत्रांबाबत विचारणा केली होती. वायरमन लोंढे यांनी डॉक्टरच्या वडिलांना नवीन वीज मीटर बसवण्यासाठी चार हजार रुपयाची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी वायरमन लोंढे यांना मागणी प्रमाणे चार हजार रुपये दिले होते.

त्यानंतर देखील लोंढे यांनी वीज मीटर बसवून देण्याचे काम केले नाही. त्यामुळे डॉक्टरचे वडील अर्थात तक्रारदार यांनी वायरमन लोंढे यांना याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांना पुन्हा दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पुन्हा लाच देण्याची तक्रारदारांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जळगाव एसीबी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. पंचांसमक्ष पडताळणी केली असता वायरमन लोंढे दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडले. पर्यवेक्षण व तपास अधिकारी योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी स्मिता नवघरे, पो कॉ सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाई कामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment