जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमे अंतर्गत अकराशे पेक्षा अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 13 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसवण्यासह गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दि. 24 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी आपली पथके तयार करून वाहनांची कसून तपासणी केली. या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने आणि अल्पवयीन वाहन चालक यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या मोहिमेत एकूण 1106 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण तेरा लाख एकाहत्तर हजार चारशे पन्नास रुपये तडजोड शुल्क (दंड) वसुल करण्यात आला आहे. जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.







