राष्ट्रवादीच्या आमदाराने मारली शिपायाच्या पोटात लाथ

On: September 19, 2020 5:28 PM

शिर्डी : अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गाडी जरा हळू चालवा, असे सांगितल्याचा राग आल्याने ग्रामपंचायत शिपायाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आ. डॉ. किरण लहामटे यांच्यावर करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायत शिपाई रामदास बांडे यांच्या तक्रारीनुसार राजूर पोलीस स्टेशनला भा.द.वि. 504, 506 नुसार अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खडकी बुद्रुक गावातून तक्रारदार रामदास बांडे हे पायी चालत होते. त्यावेळी आ. किरण लहामटे यांच्या गाडीने त्यांना कट मारला. त्यावेळी रामदास बांडे यांनी मोठ्याने ओरडून गाडी हळू चालवा, असे त्यांना सांगितले. आपल्याला गाडी हळू चालवा असे म्हटल्याचा राग आल्यामुळे आ.किरण लहामटे यांनी गाडी थांबवली व ते खाली उतरले. त्यांनी रामदास बांडे यांच्या छाती, पोटावर लाथ मारत मला ओळखतो का? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीत बसून ते निघून गेले असे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेवरून आता राजकारण तापण्यास विषय मिळाला आहे. या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान अशी घटना घडली नसल्याचे आ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे. विरोधक आपली जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment