जळगाव – येथील जैन हिल्स येथे आधुनिक जीवनशैलीत वाढत चाललेल्या आजारांवर उपाय म्हणून पाच दिवसीय (आरोग्य संवर्धन शिबीर) नवीन आहार पद्धती व रोगनिदान शिबिराचा शुभारंभ झाला. बडी हंडा सभागृहात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी योग्य आहार पद्धती स्वीकारल्यास अनेक व्याधी मुळातून दूर होऊ शकतात, असा ठाम संदेश मार्गदर्शक बी.व्ही. चव्हाण यांनी दिला.
शिबिराचे औपचारिक उद्घाटन जैन फार्म फ्रेश फुड्सचे वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, हरिद्वारचे महामंडलेश्वर गिरीधर गिरी महाराज, कानळदा कण्व आश्रमचे अद्वैतानंद सरस्वती महाराज आणि मार्गदर्शक बी. व्ही. चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. आरंभी दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली तर सरोज चव्हाण यांनी ईशप्रार्थना घेतली. सूत्रसंचालन डॉ. मोनिका भावसार यांनी केले. या शिबिराचे आयोजन जैन इरिगेशनचे सहकारी तसेच शहरातील मान्यवरांसाठी करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा देऊन त्यासंदर्भाच्या महत्त्वाच्या सूचना कंपनीचे सहकारी सुचेत जैन केल्या.
उद्घाटनानंतर मार्गदर्शक बी. व्ही. चव्हाण यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय अनुभव कथन करताना उपस्थितांना अंतर्मुख केले. “लहानपणापासून मला पोटाचे तीव्र विकार होते. सर्व प्रकारच्या पॅथी, उपचार करूनही फरक पडला नाही. वयाच्या ४५व्या वर्षी आजाराला कंटाळून आत्महत्येचा विचार मनात आला. मात्र त्याच वेळी मी ‘न्यू डायट सिस्टीम’ स्वीकारली आणि हळूहळू पोटाचा आजार पूर्णपणे बरा झाला,” असे त्यांनी सांगितले. आज वयाची ८० वर्षे पूर्ण करूनही ते देशविदेशात फिरून या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. रामायण-महाभारत काळातील अन्नसेवनाचा उल्लेख करताना त्यांनी कंद, मूळ, फळ, फुले, पाने, हवा, प्रकाश आणि आकाश हे नऊ घटक मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. “पेट्रोलच्या गाडीत डिझेल भरले तर इंजिन बिघडतेच; त्याचप्रमाणे शरीराला न शोभणारा, अयोग्य आहार घेतला तर आजार अटळ आहेत,” असे प्रभावी उदाहरण देत त्यांनी ‘आहार हेच आरोग्य आणि चुकीचा आहार हेच अनारोग्य’ हे सूत्र मांडले.







