एमपीडीए कायद्याची मोठी कारवाई – पाच जण स्थानबद्ध

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून जातीय दृष्टीने अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात हिंदू मुस्लीम अशा दोन गटात नेहमीचे लहान मोठे वाद अथवा दंगलीचे गुन्हे होत असतात. या शहराला दंगलीची पार्श्वभूमी असल्याचे विविध घटनेतून वेळोवेळी दिसून आले आहे. रावेर शहराचा इतिहास व शासकीय अभिलेखाची पहाणी केली असता सन 1946 साली जातीय दंगलीची पहिली घटना घडली असल्याची नोंद आढळून येते.

अशा संवेदनशील स्वरुपाच्या घटनांना तिव्र स्वरुपाचा आळा बसावा तसेच अशा दंगली घडवून आणणा-या व्यक्तींवर कठोर स्वरुपाची कारवाई करुन रावेर शहरात शांतता नांदावी, तेथील नागरिकांनी सुखाने रहावे यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी अधिकारी वर्गाला सुचना दिल्या होत्या.
त्या सुचनांना अनुसरुन उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पो.नि.बापू रोहोम, पो.नि. रामदास वाकोडे, स.पो.नि.शितल नाईक, पो.उ.नि. संदिप पाटील, मनोज वाघमारे यांच्या अख्त्यारीत दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, महेश महाजन, राजेंद्र करोडपती, विजय जावरे, नंदु महाजन, महेंद्र सुरवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, तुषार मोरे, सुरेश मेढे, जितेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, मनोज म्हस्के, निलेश लोहार, ईस्माईल शेख, भरत सोपे, नितीन डांबरे, जितेंद्र जैन आदी कर्मचारी वर्गाने परिश्रम घेत पाच जणांना एमपीडीए कायद्यानुसार ताब्यात घेण्याची कारवाई केली. ताब्यातील पाचही जणांना नाशीक येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मधुकर उर्फ मधु पैलवान रामभाऊ शिंदे ( 62) रा. शिवाजीचौक रावेर, स्वप्नील मनोहर पाटील ( महाजन ) (26) बक्षीपुर ता. रावेर, शे. मक्बुल अहमद शेख मोयीउद्दीन (57) मन्यारवाडा रावेर, शे. कालु शेख नुरा (53) मन्यारवाडा रावेर, आदिलखान उर्फ राजू बशिरखान (22) फुकटपुरा रावेर अशी अटकेतील पाच जणांची नावे आहेत.
या पाच जणांविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती संकलीत करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन तो प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे कडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाचही जणांना एक वर्षासाठी एमपीडीए कायद्यानुसार त्यांना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार त्यांना तात्काळ विनाविलंब ताब्यात घेवून आज मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.सदर प्रस्ताव करण्यासाठी पोलिस उप निरिक्षक संदिप पाटील (एमआयडीसी पोलिस स्टेशन) यांच्यासह कर्मचारी विजय जावरे व ज्ञानेश्वर चौधरी (रावेर पो.स्टे.) यांनी परिश्रम घेतले आहे.

रावेर शहराची जातीय दंगलीची पार्श्वभुमी लक्षात घेता रावेर शहर अशांतता क्षेत्र घोषीत करण्याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 51 नुसार शासनास अहवाल सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here