रिक्षा घेण्यासाठी कल्पेशने सुरुच ठेवला हट्ट —- मारहाणीत बापाने मृत्युला मिठी मारली घट्ट

On: February 19, 2026 11:09 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जन्मदाते आई बाप मुलांच्या जन्माला पुरत नाही हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. मुलांना शिक्षण देऊन ते त्यांना स्वबळावर उभे करतात. त्यांचे विवाह पार पाडून त्यांचा संसार मार्गाला लावतात. त्यानंतर आई वडीलांची जबाबदारी जवळपास पुर्ण झालेली असते. प्रमुख जबाबदा-या पार पाडल्यानंतर आई बापाने आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणे क्रमप्राप्त असते. मात्र काहींच्या नशिबी कष्ट लिहीले असते. काही मुले शेवटपर्यंत आई बापाकडून काही ना काही अपेक्षा ठेवतात. आम्हाला जन्म दिला म्हणजे तुम्ही आमच्या गरजा पुर्ण केल्याच पाहिजे असा काही मुले हट्ट धरुन असतात. तळागाळातील अशिक्षीत घरात असे प्रकार प्रकर्षाने दिसून येतात.

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव या तालुक्याच्या गावी एम.जे. नगर परिसरात भिकन मोरे हे सेवानिवृत्त वायरमन आपल्या परिवारासह रहात होते. पत्नी सखुबाई आणि मुलगा कल्पेश असा त्यांचा छोटासा परिवार होता. महाराष्ट्र् राज्य विज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर भिकन मोरे यांना थोडीफार रक्कम मिळाली होती. त्यांची पत्नी सखुबाई मोलमजुरी करुन कुटूंबाला हातभार लावत होती. त्यांचा मुलगा कल्पेश हा तसा रिकामाच होता. या जगात कामधंदा शोधणे हे देखील एक कामच असते. कामधंदा शोधण्याचे काम तो करत होता. दरम्यानच्या कालावधीत रिक्षा चालवण्याचा विचार त्यांचा मनात रुजला होता. काहीही करुन रिक्षा विकत घ्यायची आणी आपला उदरनिर्वाह करायचा हे त्याने मनाशी निश्चीत केले होते. नवी कोरी रिक्षा विकत घ्यायची, तिची चांगली सजावट करायची, तिच्यात कर्णमधुर संगीत व्यवस्था करायची आणि पैसे कमवायचे असे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याला पाच लाख रुपयांची गरज होती.

संशयित आरोपी

रिक्षा घेण्यासाठी पाच लाख रुपये आपल्या वडीलांनी आपल्याला रोख स्वरुपात आणि ते देखील लगेच द्यावे अशी अपेक्षा तो बाळगून होता. तसा तगादा त्याने वडील भिकन मोरे यांच्याकडे दररोज लावला होता. आपल्याकडे एकदम पाच लाख रुपये नाहीत असे भिकन मोरे यांनी मुलगा कल्पेश याला समजावून सांगितले होते. आपल्याकडे तिन लाख रुपये असून ते मी तुला देण्यास तयार आहे. उर्वरीत दोन लाख रुपयांचे बॅकेकडून कर्ज घेण्यासा चांगला सल्ला त्यांनी कल्पेश यास दिला होता. त्यांचा तो सल्ला योग्य होता. मात्र काही केल्या कल्पेश वडील भिकन मोरे यांचे ऐकण्यास तयार होत नव्हता. मला आजच एकदम पाच लाख रुपये हवेत असा हेका त्याने लावला होता. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विजयकुमार ठाकूरवाड डीवायएसपी

गेल्या दोन वर्षापासून कल्पेश हा पाच लाख रुपयांची मागणी करतच होता. त्याने वेळीच वडीलांचा सल्ला मान्य केला असता तर दोन वर्षाच्या कालावधीत त्याचा रिक्षा व्यवसाय सुरु झाला असता. तसेच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते देखील फिटण्यास सुरुवात झाली असती. मात्र पाच लाख रुपये वडीलांनी द्यावे या मागणीवर तो ठाम होता. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. या दोन वर्षाच्या कालावधीत त्याचा वडीलांवरील राग वाढतच होता. तो वडील भिकन मोरे यांच्यासोबत दररोज वाद घालत होता. अखेर या वादाची परिणीती एका दुर्दैवी घटनेत परावर्तीत झाली.

अमितकुमार मनेळ पोलिस निरीक्षक

14 फेब्रुवारी 2026 हा दिवस उजाडला. या दिवशी सायंकाळी साडे सहा वाजता त्याने घरात वडीलांसोबत नेहमीप्रमाणे वाद घालण्यास सुरुवात केली. मला आत्ताच रिक्षा घेण्यासाठी पाच लाख रुपये द्या असा त्याने हट्टच धरला. कल्पेशचा हट्ट बघून भिकन मोरे यांनी त्याला खुप समजावण्याचा प्रयत्न केला की माझ्याकडे एवढी रक्कम या घडीला नाही. मी तुला एवढी रक्कम आत्ताच्या आता देऊ शकत नाही. वडिलांच्या बोलण्याचा कल्पेशला मोठा राग आला. रागाच्या भरात त्याने वडील भिकन मोरे यांना शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण सुरु केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने घरात पडलेली लाकडी काठी उचलून तिच्याने त्यांना जोरजोरात मारहाण सुरु केली. लाकडी काठीने अंगावर, पायावर आणि डोक्यावर त्याने बेदम मारहाण सुरु केली. या जबर मारहाणीत भिकन मोरे बेशुद्ध पडले.

भरत चौधरी सहायक पोलिस निरीक्षक

वडील बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर कल्पेश आणि त्याची आई घाबरली. दोघांनी मिळून भिकन मोरे यांना रिक्षाने एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. भिकन मोरे यांच्या अंगावरील जबर जखमा आणि त्यांची अवस्था बघून हा पोलिस केसचा मामला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी कल्पेश यास त्याच्या वडीलांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. खासगी डॉक्टरांच्या समाधानासाठी कल्पेशने होकार दिला. मात्र तो वडील भिकन मोरे यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी थेट घरीच घेऊन गेला. ग्रामीण रुग्णालयात गेले म्हणजे विनाकारण चौकशी मागे लागेल आणि पोलिस तपास सुरु होईल असा विचार कल्पेशने मनाशी केला. प्रत्यक्षात त्याचे वडील भिकन मोरे हे जबर मारहाणीत देवाघरी गेले होते.

या घटनेची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना समजली. त्यामुळे रात्री साडे अकरा वाजता चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक त्याच्या घरी धडकले. पोलिस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने कल्पेश यास काय झाले याची विचारणा सुरु केली. त्यावेळी कल्पेश काहीही बोलण्यास तयार नव्हता. मात्र त्याची आई सखुबाई यांनी पोलिसांना सत्य कथन करण्यास सुरुवात केली. कल्पेश याने त्याचे वडील भिकन मोरे यांना पट्ट्याने व लाकडी काठीने जबर मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध झाले आहेत अशी माहिती सखुबाई यांनी दिली. पोलिसांनी भिकन मोरे यांची पाहणी केली असता ते मयत झाले असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी भिकन मोरे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यामुळे या घटने प्रकरणी सखुबाई मोरे यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा कल्पेश मोरे याच्याविरुद्ध वडील भिकन मोरे यांच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु. र. नं 47/2026 भारतीय न्याय संहिता 103(1) 352 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी कल्पेश मोरे यास अटक करण्यात आली. फिर्यादी सखुबाई यांच्या कपाळाचे कुंकू मुलाच्या कृत्यामुळे पुसले गेले. मुलगा गजाआड गेला तर पती देवाघरी गेला. मुलाच्या कृत्यामुळे सखुबाई यांच्यावर मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवण्याचा प्रसंग कायम राहिला. मुलगा मोठा झाला म्हणजे तो आपली काठी बनून आपली सेवा करेल अशी खुळी आशा त्यांनी मनाशी बाळगली असेल. मात्र त्यांच्या नशिबी एकाकी जीवन आणि मोलमजुरी करण्याची वेळ तशीच कायम राहिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप अधिक्षक विजयकुमार ठाकुरवाड व पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment