अनिताच्या प्रेमात देवानंद झाला भलता दिवाना — तिच्यासह स्वत:वर गोळी झाडून देवाघरी रवाना

On: March 1, 2026 6:40 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मुलगा असो वा मुलगी त्यांचे लग्न योग्य वयातच झाले पाहिजे असे जुने जाणते लोक सांगत होते. त्या काळात टीव्ही, मोबाईल आणि सोशल मिडीया आदी करमणूकीसह माहितीची आदानप्रदान करणारी साधने नव्हती. त्यामुळे घरात थोरा मोठ्यांच्या छत्रछायेखाली विवाहीत मुले मुली रहात होती. योग्य वेळी योग्य वयात लग्न झाल्यामुळे त्या काळातील विवाहीत मुले मुली चुकीच्या मार्गाला जात नव्हती. तशी त्यांना संधी मिळत नव्हती.

आजच्या संगणकीय युगात टीव्ही, मोबाईल आणि सोशल मिडीया अशी करमणूकीसह माहितीची आदान प्रदान करणारी विविध साधने उपलब्ध आहेत. या साधनांमुळे जग एकमेकांच्या जवळ आणि मुठीत आले आहे. या साधनांचा जसा उपयोग केला जातो तसाच त्याचा दुरुपयोग देखील केला जात आहे. आजच्या युगात मुला मुलींचे योग्य वेळी योग्य वयात लग्न जरी झाले तरी निव्वळ मोबाईलमुळे पती पत्नीत तणाव आणि घटस्फोटाच्या अनेक घटना घडतात हे एक जळजळीत वास्तव आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संबंधातून एका विवाहीत प्रियकराने एका विवाहीत प्रेयसीवर गोळीबार केल्याची घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा या गावी घडली. त्यानंतर विवाहीत प्रियकराने स्वत:वर गोळी झाडून आपली देखील जीवनयात्रा संपवली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला. यामुळे दोन परिवारांची अपरिमीत हाणी झाली.

चोपडा या तालुक्याच्या गावापासून काही अंतरावर अकुलखेडा हे गाव आहे. या गावी जगदीश काशिनाथ पाटील हा अवघा 34 वर्ष वयाचा तरुण राहतो. मुळ निमगव्हाण येथील रहिवासी असलेल्या जगदीश पाटील याचे वयाच्या विसाव्या वर्षी लग्न झाले. योग्य वेळी योग्य वयात जगदीश पाटील या तरुणाचे अनिता या अठरा वर्षाच्या तरुणीसोबत विवाह झाला. योग्य वयात विवाह झालेल्या जगदीशचे वैवाहीक जीवन सुखात सुरु होते. आर ओ वॉटर फिल्टर प्लॅंटचा व्यवसाय त्याने थाटला. या व्यवसायातून त्याला चांगले उत्पन्न सुरु झाले. बघता बघता त्याने एक चारचाकी वाहन देखील खरेदी केले. ते वाहन त्याने भाड्याने दिले. त्याच्या संसार वेलीवर एक पुत्र आणि एक कन्या रत्नाचे आगमन झाले. एकंदरीत त्याचा सुखाचा संसार सुरु होता.

दरम्यानच्या कालावधीत त्याची पत्नी अनिताच्या हातात एक अ‍ॅंड्रॉईड मोबाईल आला. हाती अ‍ॅंड्रॉईड मोबाईल आल्यामुळे ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाटस अ‍ॅप असे विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्म लिलया हाताळू लागली. “कर लो दुनिया मुठ्ठीमे” या स्लोगनने मोबाईल युगाची सुरुवात झाली होती. मोबाईलच्या माध्यमातून जग तिच्या अगदी जवळ आणि मुठीत आले.

बघता बघता अनिताला मोबाईलचे वेड लागले. यु ट्युब, व्हाटस अ‍ॅप हाताळता हाताळता तिला इंस्टाग्रामचे वेड लागले. ती दररोज इन्स्टाग्रामवरील रिल बघू लागली. तिला इन्स्टाग्रामवरील रिल बघण्याचे वेड अर्थात व्यसन जडले. त्या माध्यमातून ती देवानंद धनगर या पस्तीशीतील तरुणाच्या संपर्कात आली. देवानंद धनगर हा शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील रहिवासी होता. ज्याप्रमाणे अनिता विवाहीत होती तसाच देवानंद देखील विवाहीत होता. दोघे विवाहीत इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले.

दोघे एकमेकांसोबत मोबाईलवर चॅटींग करु लागले. अहिराणी भाषेत एक गाणे तयार करण्याचा प्रस्ताव देवानंद याने अनिताजवळ ठेवला होता. त्या गाण्यात अनिताला रोल देण्याची त्याची इच्छा होती. हा प्रकार एके दिवशी तिचा पती जगदीशला समजला. जगदीशने या बाबत अनिताला जाब विचारला. त्यावेळी तिने आपले देवानंद सोबत व्हाटस अ‍ॅपवर चॅटींग झाल्याचे कबुल केले. मात्र मी मरेपर्यंत तुझीच राहीन असे तिने पती जगदीशला सांगून हाताबाहेर जाणारी परिस्थिती काबुत ठेवली. त्यामुळे जगदीश शांत झाला.

आपला लग्नाचा पती असून “हम दो हमारे दो” असा आपला सुखाचा चौकोनी परिवार आहे हे तिने समजून घेतले. त्यामुळे तीने देवानंद सोबतची अटॅचमेंट कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला. ती त्याला टाळू लागली. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून अनिताच्या संगतीत राहण्याची, तिच्यासोबत चॅटींग़ करण्याची सवय जडलेला देवानंद तिचा दिवाना झाला होता. त्याने आपल्या छातीवर अनिताच्या टॅटूसह ‘अनु’ माझी बायको असे गोंदून घेतले होते. काही केल्या देवानंद तिचा नाद सोडण्यास तयार नव्हता. देवानंदने आपल्या छातीवर अनिताचा फोटो आणि तिचे नाव गोंदून घेतल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. आपला पती परस्त्रीच्या नादी लागल्याचे बघून त्याची पत्नी त्याला कायमची सोडून निघून गेली. पत्नी सोडून गेल्यामुळे देवानंदला रान मोकळे झाले. मात्र इकडे अनिता त्याला टाळत होती. त्यामुळे एकाकी पडलेला देवानंद काही केल्या अनिताचा नाद सोडण्यास तयार नव्हता.

दिनांक 28 फेब्रुवारी 2026 शनिवारचा दिवस उजाडला. या दिवशी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे अनिताची मुले शाळेत गेली. अनिताचा पती जगदीश हा मुळ गावी निमगव्हाण येथे त्याच्या आईला पापड देण्यासाठी गेला. यावेळी अनिता घरी एकटीच होती. सकाळी नऊ वाजता तिने गल्लीतील इतर महिलांच्या मदतीने स्वत:च्या अंगणात कुरडया तयार केल्या. आज आपल्या जीवनातील अखेरचा दिवस असल्याचे तिला माहितीच नव्हते. ते केवळ नियतीला माहिती होते. साडे दहा वाजता शाळेत गेलेली तिची मुलगी घरी परत आली. त्यावेळी घर बंद होते. घराचा लोखंडी दरवाजा उघडण्यासाठी तिच्या मुलीने बारीक जाळीतून हात टाकत आतून बंद असलेला दरवाजा उघडला. घराचा दरवाजा उघडताच अनिताची मुलगी एका क्षणासाठी निशब्द झाली. तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. मात्र पुढच्याच क्षणी ती जोरजोरात ओरडत धाय मोकलून रडू लागली. तिने पाहिलेले दृश्य भयावह होते. तिची आई अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या शेजारीच देवानंद धनगर हा देखील रक्ताच्या थारोळ्यात निपचीप पडलेला होता. बाजूलाच एक पिस्टल आणि दोन काडतुसे पडलेली होती. एकुणच भयावह दृश्य अनिताच्या मुलीने बालपणात पाहिले होते. ते दृश्य तिच्या बालमनावर कोरले गेले. ते दृश्य तिच्या नजरेसमोरुन सरकण्यास तयार नव्हते.

प्रसंग बाका होता. प्रसंगाचे भान ठेवत तिने वडील जगदीश पाटील यांना कॉल लावला. पप्पा तुम्ही लवकर घरी या आपल्या घरात आई व तिच्या जवळ अजुन एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे असा तिने निरोप दिला. मुलीचा रडवेला आवाज आणि निरोप ऐकताच जगदीशच्या मनात धस्स झाले. निमगव्हाण येथे आईला पापड देण्यासाठी आलेला जगदीश आईला सोबत घेऊन लागलीच अकुलखेडा येथे येण्यास निघाला. घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती.

जगदीश व त्याच्या आईने घरात जावून पाहिले असता घरात अनिता व देवानंद या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसून आले. देवानंद याने हंबरडा फोडताच त्याला गल्लीतील लोकांनी घराबाहेर काढत शांत केले. या घटनेची चोपडा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आदींनी आपापल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकामी उप जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

उप विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने पुढील तपासाला सुरुवात केली. मयत देवानंद धनगर यास अनिताचा पती जगदीश याने यापुर्वी कधी पाहिले नव्हते. मात्र अनिताचे देवानंद नावाच्या व्यक्तीसोबत मोबाईलवर चॅटींग़ होत असल्याचे त्याला माहिती होते. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्याचे नाव देवानंद सुभाष धनगर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आपल्या पत्नीसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चॅट करणारा हाच तो देवानंद धनगर असल्याचे जगदीशच्या लक्षात आले.   

अनिता ही देवानंद यास वेळ देत नसल्यामुळे तो तिला मारुन टाकणार असल्याचा आणि स्वत: देखील आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पोलिसांना त्याच्या मोबाईलमधे आढळून आला. देवानंदने स्वतःच्या मोबाइलवर, ‘जगदीश मला माफ कर माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मला ती टाळत आहे. दुसऱ्यासोबत बोलते, मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही’ असा व्हॉट्सअॅप मेसेज देवानंद याने टाइप केला होता. हा मेसेज जगदीशला रवाना करण्याचे राहून गेल्याचे समजते. या कालावधीत अनिता आणि देवानंद यांच्यात वाद व वादाची परिणीती गोळीबारीत झाल्याचे म्हटले जाते.

हत्या व आत्महत्येच्या या घटने प्रकरणी मयत अनिताचा पती जगदीश काशिनाथ पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला देवानंद सुभाष धनगर याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजि नं 65/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) सह आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सोशल मिडीयाचा दुरुपयोग केल्याने काय परिणाम होतात हे या घटनेतून दिसून येते. अनिताच्या प्रेमात दिवाना झालेल्या देवानंद याने स्वत:च्या छातीवर तिचा फोटो आणि नाव गोंदून घेतले होते. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी देत त्याच्यापासून सुटका करुन घेतली. देवानंदची पत्नी त्याच्यापासून मुक्त झाली. देवानंद याने स्वत:वर गोळी झाडून जीवनातून आपली मुक्तता करुन घेतली. याशिवाय अनिता देखील देवाघरी गेली. मात्र अनिताचा पती एकाकी झाला. महत्वाचे म्हणजे तिची दोन्ही मुले मातृप्रेमाला कायमची पारखी झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment