सरपंच, उप सरपंच यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न विफल 

On: March 5, 2026 8:32 AM

जळगाव – अपघाताचा बनाव करत कट रचून सरपंच व उप सरपंच यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तसेच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

26 जानेवारी 2026 रोजी चाळीसगाव तालुक्यातील दस्केबर्डी या गावाचे सरपंच भगवान देवरे आणि उप सरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे दोघे बुलेटने चाळीसगांव येथून दस्केबर्डी येथे जात होते. त्यावेळी शिदवाडी शिवारात समोरुन येणा-या पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. त्या धडकेत दोघे खाली पडले. सरपंच भगवान देवरे हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेबाबत रस्ता अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार उपसरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे यांनी मेहुणबारे पोलिसात दिली होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड व प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक सुहास आव्हाड व अंमलदार करत होते. सी.सी.टी.व्ही फुटेज पाहणी व तांत्रीक तपासाच्या आधारे हा घातपात असल्याचे उघडकीस आले. राजकीय मतभेदातून जीवे ठार करण्याचा हा प्रकार असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

भिमराव पांडुरंग रोकडे, सचिन भिमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी व लक्ष्मण अशोक महाजन रा. वाडे ता. भडगांव (पिकअप वाहन मालक) यांनी कट रचत अपघाताचा बनाव करुन हा प्रकार केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्हयात लावण्यात आलेली अपघातची कलमे कमी करुन फौजदारीपात्र कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याबाबत कलमे लावण्यात आली आहेत. या गुन्ह्यात चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, पोना योगेश पाटील, पोकॉ विनोद बेलदार, संजय लाटे यांनी या तपासात सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुहास आव्हाड व पोकॉ संजय लाटे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment