जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात वरसाडे तांडा क्रमांक तीन हे एक शांत आणि छोटेसे गाव. आपण भले आणि आपले काम भले अशी या गावातील बहुसंख्य लोकांची विचारसरणी. साधे, शांत आणि श्रमजीवी लोकवस्तीचे गाव अशी या गावाची ओळख सांगितली जाते. दुपारच्या जेवणाचा डबा सकाळी हातात घेऊन शेतात जाणारी माणसं, दुपारी झाडाखाली विसावणारे वृद्ध आणि सायंकाळी बहुसंख्य घरातून उठणारा चुलीचा धुर असे या गावचे चित्र. या गावातील जीवनचक्र नेहमीच्या लयीत सुरु होते.
दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ची रात्र या गावाच्या इतिहासात एक काळी रेष उमटवून गेली. या रात्री या गावातील विजय भिमा राठोड नावाचा अवघा पंचवीस वर्ष वयाचा तरुण घरातून कुणाला काही न सांगता घराबाहेर पडला तो कायमचा. 25 फेब्रुवारीचा दुसरा दिवस उजाडला. या दिवसाचा सुर्य नेहमीप्रमाणे उगवला, मात्र विजय घरी परतला नाही. सुरुवातीला घरच्यांना वाटलं तो त्याच्या कुणा मित्राकडे गेला असेल. पण जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतशी त्याच्या घरातील सदस्यांच्या चेह-यावरील चिंता भितीत बदलत होती.

त्याचा भाऊ संजय भिमा राठोड हवालदिल झाला. तो गावभर भटकू लागला. हिंडत हिंडत तो प्रत्येकाचे दार ठोठावू लागला. तो रडवेल्या स्वरात प्रत्येकाला विचारु लागला, “माझा भाऊ विजय दिसला का?” प्रत्येकाकडून त्याला एकच उत्तर मिळाले …. नाही. बघता बघता सकाळचा उगवता सुर्य मावळतीला गेला. मात्र ना विजय घरी आला ना त्याचा तपास लागला. बघता बघता दुसरा दिवस उजाडला. मात्र विजय घरी आला नाही. त्याची परत येण्याची आशा मावळत्या सुर्याप्रमाणे मावळू लागली.
अखेर 26 फेब्रुवारी रोजी बेपत्ता विजयचा भाऊ संजय भिमा राठोड याची पावले पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या दिशेने वळली. तो पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनची पायरी चढला. पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यांची भेट घेत त्याने आपली कैफीयत मांडली. माझा भाऊ विजय राठोड हा गेल्या 24 फेब्रुवारीच्या रात्री पासून बेपत्ता असून त्याचा घातपात झाला असल्याची त्याने शक्यता वर्तवली. त्याच्या तक्रारीनुसार सुरुवातीला पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला 15/2026 या क्रमांकाने मिसींग़ दाखल करण्यात आली. ही एक साधी बेपत्ता नोंद नव्हती तर ती एका भीषण सत्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने सुरु झालेली वाटचाल होती.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या प्रभारी निरीक्षकांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या मिसींगचा तपास सुरु केला. बेपत्ता विजय राठोड याचे मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग, त्याने केलेला शेवटचा कॉल, त्याला शेवटचे कुणी पाहिले? या मार्गाने तपासाला सुरुवात झाली. या तपासाचा एक एक धागा जोडण्यात आला. या सर्व तपासातून एक संशयास्पद नाव पुढे आले. ते म्हणजे गावातील रहिवासी असलेल्या संजय परशुराम जाधव याचे.
संशयाची सुई आणी तपासाची सुरी संजय जाधव याच्यावर स्थिरावली. त्याला चौकशीकामी पोलिस स्टेशनला बोलावण्यात आलं. सुरुवातीला त्याने साळसुदपणाचा आव आणला. आपल्याला या ठिकाणी का बोलावले? या ठिकाणी माझे काय काम? अशा अविर्भावात तो बोलू लागला. मात्र प्रभारी अधिका-यांच्या तीक्ष्ण प्रश्नांनी त्याचा तोल ढासळण्यास सुरुवात झाली.
असत्य ऐकण्याची खरी मजा तेव्हा असते ज्यावेळी आपल्याला सत्य माहित असते. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना संजय जाधव याच्याकडून सत्य वदवून घ्यायचे होते. मात्र तो असत्य कथन करत होता. गुप्त बातमीदारासह तांत्रीक तपासातून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संजय जाधव आणी त्याची पत्नी सोनाली जाधव या दोघांची नावे हुडकून काढली होती. या दोघांकडून त्यांना सविस्तर माहिती हवी होती. पोलिस स्टेशनला आलेल्या संजय जाधव याच्याकडून पोलिसांना सखोल माहिती हवी होती. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. एका पाठोपाठ एक प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती सुरु होती. त्याची उत्तरे विसंगत येत होती. त्याच्यावर सुरु असलेल्या प्रश्नावलीचा रंग गडद झाला होता. काही तासांच्या कठोर चौकशीनंतर संजयचा मुखवटा अखेर गळून पडला. त्याने दिलेली कबुली ऐकून उपस्थित प्रत्येक जण सुन्न झाला.
“माझ्या पत्नीचे आणि विजयचे संबंध होते…” या एका वाक्याने संपूर्ण प्रकरणाचा चेहरामोहरा बदलला.
संजयने पुढे सांगितलं — त्याची पत्नी सोनाली आणि विजय यांच्यातील संबंध केवळ प्रेमापुरते मर्यादित नव्हते. त्या संबंधातून एक धोकादायक खेळ सुरु होता.
संजयने आरोप केला की त्याची पत्नी सोनालीचे अश्लील व्हिडिओ विजयने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. त्या व्हिडिओंच्या आधारे तो तिला धमकावत होता. ब्लॅकमेल, भीती आणी प्रेमसंबंध या तिन घटकांच्या आधारे आम्हा पती पत्नीच्या जीवनात एक भयानक वादळ आल्याचे संजय पोलिसांजवळ कथन करत होता. या भयानक वादळाचे रुपांतर विजयच्या खूनात झाल्याचे संजयने कथन केले. एकीकडे पत्नीचा विश्वासघात, दुसरीकडे समाजात होणारी बदनामी आणि तिसरीकडे ब्लॅकमेलची भीती याची परिणीती संजय आणि सोनाली या दाम्पत्याकडून विजयच्या खूनात झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
प्राप्त माहितीच्या आधारे संजय आणि सोनाली या पती पत्नीने विजयच्या हत्येचा कट रचला. या कटाचा भाग म्हणून 24 फेब्रुवारीच्या रात्री सोनालीने विजयला फोन करुन बोलावून घेतले. नेहमीप्रमाणे आपल्याला सोनालीने बोलावले असेल असे विजयला वाटले असावे. आपल्याकडे असलेल्या व्हिडीओच्या बळावर आपण तिला ब्लॅकमेल करु या विचारातून तो तिला भेटण्यासाठी गेला. पण त्याला कल्पना नव्हती की ही रात्र त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे बेपत्ता विजय जाधव याच्या कथित खून प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला संजय जाधव आणि सोनाली जाधव या दाम्पत्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली. मात्र त्या रात्री नेमकं काय घडलं, याचं पूर्ण सत्य अजूनही धूसर आहे.
अटकेतील संजय जाधव आणि सोनाली जाधव हे संशयीत आरोपीच्या कठड्यातील दाम्पत्य कधी सांगतात आम्ही विजयचा गळा आवळून खून केला, कधी सांगतात आम्ही त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार केले आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण एक गोष्ट जवळपास खरी आहे की त्या रात्री विजयचा निर्दयीपणे खून करण्यात आला.
विजयचा जीव घेण्यात आला आणि त्याच्यासोबत अनेक प्रश्न अजूनही अंधारात गडप आहेत. हा खून झाल्यानंतर देखील तपासाचा पिक्चर अजून बाकी आहे. संजय आणि सोनाली यांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले. पोलिसांना ते कधी सांगतात की आम्ही मृतदेह जाळला. कधी सांगतात की आम्ही तो नाल्यात फेकून दिला. कधी जंगलात टाकून दिल्याचे सांगतात. या परस्परविरोधी कथांमुळे पोलिस तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
ही कथा केवळ गुन्ह्याची नाही तर मानवी भावनांच्या धोकादायक बाजूची आहे. आजही वरसाडे तांडा या गावात रात्री स्मशान शांतता असते. त्या शांततेत एक भीती दडलेली असते. बेपत्ता विजय परत येणार का? विजयचा आवाज परत ऐकू येणार का? असा भाबडा प्रश्न त्याचे घरातील सदस्य विचारत आहेत. विजयचा आवाज हरवला आहे. पण त्याची तपास कथा अजून जिवंत आहे. तपास अजून सुरु आहे. सत्याचे काही धागे अजूनही सापडायचे आहेत.
एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. राग, भीती आणि चुकीचे निर्णय हे तीन घटक एकत्र आले की त्यातून जन्माला येतो एक कुविचार. त्यातून घडतो एक भयंकर गुन्हा. अशा गुन्ह्यांची सावली कधीच पूर्णपणे नाहीशी होत नाही. या प्रकरणी मृतदेहाचा शोध, खूनाची नेमकी पद्धत आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर वेगाने सुरु असल्याचे म्हटले जात आहे.






