नवी दिल्ली : आइस्क्रीम तयार करणाऱ्या “क्वॉलिटी लिमिटेड” या कंपनीवर 1400 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यत आला आहे. अधिक तपासासाठी दिल्ली, बुलंदशहर, सहारनपूर, अजमेर व पालवाल इत्यादी ठिकाणी सीबीआयने धाडी घातल्या आहेत.
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका समुहाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. “क्वॉलिटी लिमिटेड” या कंपनीचे संचालक संजय धिंग्रा, सिद्धांत गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्यासह अजून काही जणांची नावे तक्रारीत दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
बँकेचा पैसा अन्यत्र वळवणे, बनावट कागदपत्रे व पावत्या तयार करणे, खोट्या मालमत्ता दाखवणे अशा स्वरुपाचे अनेक गैरव्यवहार “क्वॉलिटी लिमिटेड” या कंपनीकडून झाल्याचे बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली काही बँकांच्या समुहाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमुद केले होते.
बँक ऑफ इंडियासह या बँकांच्या गटात कॅनरा बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, सिंडिकेट बँक या बॅकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयने देशभरात काही ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये नेमके काय पुरावे हाती लागले याची माहिती समोर आली नाही.