पुणे : शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात काही दिवसांपुर्वी दोन पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्या घटनेची शाई अजून वाळली नसतांना काल झालेल्या दोन महिला पोलिस कर्मचा-यामधील जोरदार हाणामारीमुळे पुणे मुख्यालय प्रकाश झोतात आले आहे. या घटनेतील पोलिस नाईक महिला कर्मचा-यास वैद्यकीय उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात हजेरी मास्टर पोलिस नाईक महिला कर्मचाऱ्याला सहकारी महिला कर्मचा-याने मारहाण केल्याच्या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. यातून अंतर्गत वाद समोर आला आहे.
ड्युटी वाटप व त्यातून होणाऱ्या देवाण घेवाणीतून ही हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. संबंधित महिला सोमवारी सकाळी पोलीस नाईक ड्युटी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचा-याकडे गेली होती. त्यावेळी दोघींमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. या शाब्दिक चकमकीचे रुपांतर नंतर एकमेकांवर धावून जाण्यत झाले. दोघांमधील आरडाओरड व हाणामारी बघून इतर कर्मचारी तेथे धावत आले. त्यातील जखमी महिला कर्मचा-याला मारहाण करणा-या महिलेच्या तावडीतून सोडवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल व गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली आहे. काही दिवसांपुर्वी सायबर पोलीस स्टेशनमधील दोघा पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्यावेळी दोघा कर्मचाऱ्यांची सायबर पोलीस स्टेशनमधून तात्काळ उचलबांगडी करुन त्यांना मुख्यालयात जमा करण्यात आले होते.