मुंबई : मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
मुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशा-यामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन बृहन्मुंबई मनपातर्फे करण्यात आले आहे.