मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चित्रपट व टीव्हीवर काम करणाऱ्या जवळपास ५० सेलिब्रिटींची नावे एनसीबीच्या समोर आली आहेत. यामधे प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्माते यांचा समावेश आहे. त्या सर्वांना योग्य वेळी टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांपासून सुरु झालेल्या तपासाला हळूहळू ड्रग्जच्या तपासाचे वळण लागले. सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या तपासाच्या माध्यमातून बॉलीवूडचे ड्र्ग्ज कनेक्शन समोर आले व त्यातून एनसीबीच्या तपासाला सुरुवात झाली आहे.
एनसीबीने फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, छोट्या पडद्यावरील कलाकार अबीगेल व सनम जोहर यांची चौकशी केली आहे. सहा तासांच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीला मिळाल्याचे समजते. या सर्वांची चौकशी अद्याप अपूर्ण असून त्यांना पुन्हा पाचारण केले जाईल.
ड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्यापुरते मर्यादीत राहिले नसून ते आता छोट्या पडद्यावरील कलाकारांपर्यंत पोहोचले आहे. चित्रपटासह टीव्हीवर काम करणा-या जवळपास ५० सेलिब्रिटींची नावे उघड झाली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश आहे.