मेहुणीवर संशय घेणे महागात पडले-जावयाला मारुन सासरवाडीतच गाडले

निपाणी : अती प्रमाणात मद्य सेवन करणारा पती हा केवळ त्याच्या पत्नीच्याच डोक्याला ताप ठरत नाही, तर त्याच्या घरातील सर्व सदस्यांसाठी तो डोकेदुखी ठरत असतो. गडहिंग्लज येथील सचिन भोपळे या दारुड्याच्या बाबतीत देखील असेच घडत होते. तो अती प्रमाणात मद्य सेवन करुन पत्नीला त्रास देत होता. मात्र हळूहळू त्याने मर्यादा ओलांडली. तो पत्नीसह तिच्या माहेरच्या लोकांना शिवीगाळ करु लागला. त्यानंतर तो मेहुणीच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. अखेर त्याची पत्नी चिडली. तिने तिच्या माहेरच्या मंडळींच्या कानावर हा प्रकार घातला व त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला.

पत्नीने बहिण व भावाच्या मदतीने त्याला ठार करुन माळरानावरच्या घराजवळच त्याला गाडले. मात्र त्यांच्या एका चुकीमुळे त्यांच्या दुष्कृत्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

गडहिंग्लज येथील सचिन भोपळे याचा विवाह गेल्या दहा अकरा वर्षापूर्वी हंचिनाळ येथील राजाराम घाटगे यांची मुलगी अनिता हिच्याबरोबर झाला होता. अनिता ही दिसायला देखणी होती. त्या दोघांचा संसार फुलत होता. त्यांच्या संसार वेलीवर एका पुत्र रत्नाचे आगमन झाले. त्यामुळे त्यांच्या संसाराचा भार वाढला होता. सचिन कोल्हापूर नजिक एमआयडीसीतील एका कारखान्यात कामाला जात होता. काम मिळाल्यावर तो पत्नी व मुलासह तामगाव येथे भाड्याच्या खोलीत राहू लागला.

एमआयडीसीत काम करत असल्यामुळे त्यांची कामाची शिफ्ट बदलत असे. कधी तो बारा तास तर कधी आठ तासाच्या शिफ्ट मधे काम करत होता. घरी आल्यानंतर पत्नी व मुलाकडे बघून त्याचा कामाचा सगळा शिण निघून जात होता.

दिवसामागून दिवस जात होते. आता त्याच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती. अनिताही वयाच्या तिशीत पोहचली होती. त्यातच सचिनला आता तिच्या  वागण्या बोलण्यात बदल जाणवत होता. ती तासनतास कुणाशी तरी मोबाईलवर बोलत असायची. आपल्या सुंदर देखण्या पत्नीकडे तो आता वेगळ्याच नजरेने बघत होता. ती मोबाईलवर कुणाशी काय बोलते? आपण कामावर गेलो की ती काय करते? याच्यावर तो बारकाईने लक्ष ठेवून होता. त्याला तिच्या वागण्या बोलण्यात आणि राहणीमानात फरक जाणवू लागला होता.

अलिकडे तो कामावरुन येतांना दारु पिऊन येवू लागला. तो पत्नीसोबत भांडण काढून तिला मारहाण करत होता.या भांडणात ती देखील त्याला वरचढ ठरत होती. पती पत्नीच्या भांडणाला एकदा का सुरूवात झाली की ती भांडणे दोन तीन दिवस मिटत नव्हती. अलिकडे तर तो तिच्यावर जास्तीच संशय घेवून तुझ्या माहेरचे लोक ही तसेच आहेत. लग्नाआधी तुम्ही दोघी बहिणीनी काय काय गुण उधळले आहेत हे न समजण्यासारखे आहे. असे तो तिला भांडणात म्हणत होता. त्यामुळे तिला ही आता त्याचा भंयकर राग येत होता. तुम्ही मला काय बोलायचे बोला. मला काय म्हणायचे ते म्हणा. पण माझ्या माहेरच्या लोकांना विशेषत: माझ्या बहिणीला ही त्याच नजरेने बघून माझ्या माहेरच्या लोकांचा व बहिणीचा उध्दार करु नका असे ती त्याला बजावत होती.

आपल्या लग्नाला आता दहा अकरा वर्ष झाली आहेत. आपल्याला एक सात वर्षाचा मुलगा आहे. तुम्ही माझ्यावर संशय घेऊन मला बदनाम करु नका. दारुच्या नशेत व भांडणात तो तिला भलतेच नको ते बोलून अश्लिल आरोप करत होता. त्यामुळे अनिता त्याला खुप वैतागली होती. तिने हा सर्व प्रकार आपल्या माहेरी सांगितला होता.

तिचे म्हणणे ऐकून तिचा भाऊ कृष्णा देखील त्याच्यावर चिडला होता. त्याने त्याला हचिनाळ येथे बोलावून घेत समजावून सांगितले. तरी देखील सचिनच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. त्याचे मागचे तसे पुढे चालु झाले होते.

नेली – तामगाव येथील घरात नवरा बायको दोघेच असले की त्या दोघांच्या भांडणाला सुरुवात होत असे. तिच्या बहिणीने ही त्याला तुम्ही उगाच ताईकडे संशयाने बघून नका. तुमच्या जीभेला काही हाड आहे का नाही, काय आम्ही दोघी तुम्हाला त्यातल्या बायका वाटतो. असे खडसावून विचारले होते. तो तिलाही तसेच म्हणत होता. त्यामुळे ती देखील बहिणीच्या नवऱ्यावर चिडून होती. नवरा बायकोच्या भांडणाने वेगळेच वळण घेतले होते. अनिता ही सारखी भांडून माहेरी हंचिनाळ येथे जात होती. गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच कारणाने त्या दोघा नवरा बायकोत भांडणे झाली होती. तो ही बायको भांडून माहेरी गेली म्हणून नेली तामगाव येथे कामावर न जाता दिवस – रात्र दारु पिवून पडायचा.

लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याचे सांगून तो घरातच रहात होता. त्याला तेच कारण मिळाले होते. परंतु खरे कारण बायको माहेरी गेल्याचे होते. त्याने तिला येण्यासाठी दोन तीन वेळा फोनवर निरोप दिला होता. परंतु यावेळी सचिनला कायमची अद्दल घडवायची आहे असे तिने बहिण वनिता, भाऊ कृष्णांत याना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी सचिनलाच हंचिनाळ येथे बोलावून घेण्याचे ठरवले होते.

गुरुवार ३ सप्टेंबर रोजी अनिताने त्याला फोन करुन हंचिनाळ येथे येण्यास सांगितले. काही झाले तरी ती त्याची बायको होती. म्हणून तो तिच्या बोलवण्यावरुन त्या दिवशी सकाळीच लवकर सासरवाडी हंचिनाळ येथे गेला. तो सासरवाडीला गेला खरा, पण जाताना तो व्यवस्थीत गेला नाही. जाताना त्याने येथेच्छ मद्यप्राशन केले होते.

सासरवाडीत आपल्या सोबत पत्नी, मेहुणी, मेहुणा असे सर्वजण भांडणारच आहेत हे त्याने ओळखले होते. म्हणून त्याने घशाखाली थोडी रिचवली होती. त्याने जी अपेक्षा केली तसेच तेथे गेल्यावर घडले. सासरवाडीत गेल्यावर काहीवेळाने त्याच्या बायकोने आणि मेहुणीने त्याच्यासोबत भांडण उकरुन काढले होते. त्या भांडणात मेहुणा ही पडला होता. ते तिघेही त्याच्याबरोबर भांडण काढून त्याला नको नको ते बोलत होते.

त्याने मद्यपान केले असल्यामुळे त्याने उलट सुलट बोलून तुम्ही सगळे भांडखोर आहात. तुमच्या दोघीचे वागणेच बरोबर नाही असे म्हणून त्यांच्यावर तोडसुख घेतले. दिवसभर त्याच्यात भांडणे सुरु होती. त्याला त्यांनी त्यावेळी जावयच्या नात्याने जेवण देखील विचारले नव्हते. त्यामुळे तो जास्तच चिडला होता. भांडणात ते तिघे त्याच्या अंगावर जात होते. तो ही मागे न सरता त्यांना जशास तसे उत्तर देत होता.

त्याचवेळी तो अनिताला तुझ्या माहेरच्या घरात आणि शेतात ही वाटणी घे म्हणून सांगत होता. एक तर तो तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. तसेच तिच्या माहेरची वाटणी देखील मागत होता. त्यामुळे त्याना ही त्याचा राग येत होता. त्याच्या भांडणात त्या दिवशी संध्याकाळ झाली. संध्याकाळी उशिरा ते दोघे नवरा बायको गावातील माळावरच्या घराकडे झोपायला गेले होते. माळावरचे घर आणि गावातील घर थोडे फार जवळचे अंतर होते. भांडत भांडत ते दोघे नवरा बायको तेथे आले. तेथे ही त्याचे भांडण वाढले होते.

दारुच्या नशेत त्याने पत्नी अनिताला काठीने मारहाण करायला सुरुवात केली होती. ही बातमी गावात असणारा तिचा भाऊ कृष्णांत याला समजली. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची बहिण  वनिता आणि नात्यातील पाहुणा गणेश रेडेकर हे तेथे आले. ते तिघे आल्याचे बघून अनिताला चेव आला होता. तो तिला काठीने मारहाण करत असताना कृष्णांत याने याच्या हातातून काठी हिसकावून घेतली.

त्यावेळी अनिता आणि वनिता या दोघी बहिणीनी मिळून सचिनला खाली पाडले. तो खाली पडल्यावर तीच काठी अनिताने उचलली. यावेळी कृष्णांत, गणेश आणि वनिता यांनी त्याला दाबून धरले होते. त्याचेवेळी रागाच्या भरात असणाऱ्या अनिताने ही त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या चौघांच्या मारहाणीने सचिन घायाळ झाला होता. त्याचवेळी अनिताच्या हातातील काठी कृष्णात याने काढून घेतली. आणि त्याच काठीने त्याने सचिनच्या डोक्यात एक वर्मी घाव घातला. हे बघून अनिताने त्याच्या उरावर बसून त्याचा दोरीने गळा आवळण्यास सुरुवात केली. त्यासरशी त्याची हालचाल मंदावली होती. ती गळा दाबत असताना कृष्णांत, वनिता आणि गणेश यांनी त्याला दाबून धरले होते. या मारहाणीत आणि गळा दाबल्यामुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला होता. हे बघून त्यांची पाचावर धारण बसली होती. आपल्या हातून जावयाचा खून झाल्याचे लक्षात येताच ते घाबरले. तो रक्ताच्या थारोळयात पडला असताना त्यांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले.

त्या चौघांनी विचार करून त्याचा मृतदेह त्याच रात्री शेतात खड्डा खोदून पुरुन टाकण्याचे ठरवले. त्यांनी तशी योजना आखली आणि कामाला लागले. कृष्णांत याला गावात जेसीबीने खड्डा खोदणारा कोण आहे हे माहित होते. म्हणून जेसीबी चालक सुनिलदास राठोड यास मोबाईलवर फोन करुन  सांगितले की घरातील म्हैशीचे रेडकु मेले असून त्याला शेतात खड्डा खोदून पुरायचे आहे.

काम मिळाले म्हणून सुनिलदास राठोड हा जेसीबी घेवून माळावरील शेतात आला होता. रात्र देखील बरीच झाली होती. त्या अंधाऱ्या रात्रीच त्यांना काम करायचे असल्याने त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी जेसीबी चालकाने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदला. त्याने खड्डा खोदल्यानंतर गणेश रेडेकर याने सुनिलदास राठोड या जेसीबी चालकाला गोड बोलून चहा घेण्यासाठी म्हणून गवातील घराकडे नेले. ते दोघे चहा पिण्यासाठी गेल्यावर कृष्णांत अनिता आणि वनिता या तिघांनी मिळून बाजुला घराच्या मागे ठेवलेला सचिनचा मृतदेह आणून त्या खड्डयात पुरुन टाकला आणि हातांनी माती देखील सारली. परत आल्यावर जेसीबी चालकाने रेडकु कुठे आहे म्हणून विचारले असता त्यांनी त्याला पुरुन टाकले असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर सुनिलदास राठोड याचा विश्वास बसत नव्हता. कारण त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा न बुजता हाताने माती सारुन तो खड्डा बुजवला होता. त्याच्या मनात शंका येत होती. काही तरी काळेबेरे आहे याची त्याला खात्री वाटू  लागली होती.

त्याने सर्वांना खोदून खोदून विचारले होते. परंतु त्या चौघांनी ही त्याला गोड बोलून पैसे देऊन वाटेला लावले होते. त्याच्या मनात शंका येत असल्याने तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने ही घटना निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला सांगितली.

या घटनेची माहिती मिळताच निपाणी पोलीसांनी जेसीबी चालकाला सोबत घेत हंचिनाळ येथील कोडी मळ्यातील सर्व्हे नं.११५/९ येथे दाखल झाले. यावेळी जेसीबी चालकाने दाखवलेल्या ठिकाणी परत खड्डा उकरण्यास सुरुवात झाली. प्रांतधिकारी योगेश कुमार, डीवायएसपी मनोजकुमार नायक, एपीआय संतोष सत्यनायक, निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सलीम मजावर, प्रशिक्षानार्थ आयपीएस दीप, सहाय्यक पोलीस नि.ए.एस टोलगी, ग्रामपंचायत कार्यदर्शी शिवानंद तेली, तलाठी एस.एच गस्ते आदी यावेळी उपस्थित होते. खड्डा खणल्यानंतर त्या खड्डयातून मानवी मृतदेह दिसू लागला.

शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेनंतर यातील संशयीत आरोपी पळून गेले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. या घटनेची माहिती फिर्यादी जेसीबी चालक सुनिलकुमार राठोड याने निपाणी ग्रामीण पोलीसांत दिली होती. पोलीस संशयीत आरोपीचा शोध घेत होते.

शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी रात्री या घटनेतील संशयीत आरोपी हे नॅशनल हायवे वरील कागल नजीक आयबीपी पेट्रोल पंपाजवळ असल्याची व तेथून ते मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती निपाणी पोलीसांना मिळाली होती. एपीआय संतोष नायक याच्या पथकाने तात्काळ तेथून या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली.

ताब्यतील संशयीतांनी आपला गुन्हा कबुल केला. सचिन सदाशिव भोपळे ( ३५) रा.नेर्ली तामगाव याचा खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची पत्नी अनिता सचिन भोपळे (३०) रा.नेर्ली तामगाव, तिची बहिण वनिता चव्हाण (२९) रा. सिध्दर्नेली कागल, भाऊ कृष्णांत राजाराम घाटगे (२६) रा. हंचिनाळ आणि नातेवाईक गणेश आणाप्पा रेडेकर (२१) रा.हुन्नरगी यांच्या विरोधात भा.दं.वी.कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांनी या चौघांना निपाणी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली काठी आणि दोरी जप्त केली. या घटनेचा पुढील तपास निपाणी पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष सत्यनायक आणि त्याचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here