मुलीच्या लग्नात पंडीतच्या आडकाठीची भिती ; गळा दाबून थांबवली त्याच्या जिवनाची गती

ghoti police station nashik

नाशिक : चंगुनाबाईची मुलगी वयात आली होती. वयात आलेल्या मुलीची चंगुनाबाईला रात्रंदिवस काळजी लागून होती. आपल्या मुलीचे पाऊल वाकडे तर पडणार नाही? याची तिला नेहमी चिंता असे. चंचल मन असलेल्या चंगुनाबाईच्या मुलीचे गावातील पंडीत ढवळू खडके या तरुणासोबत गुपचूप प्रेम प्रकरण सुरु होते. गावातील पंडीत सोबत आपल्या मुलीचा काय मामला सुरु आहे याची चंगुनाबाईला अजून खबर नव्हती.

नाशिक जिल्हयाच्या इगतपुरी तालुक्यातील कातोरेवाडी या गावी चंगुनाबाईची मुलगी आणि पंडीत रहात होते. दोघे एकाच गावचे रहिवासी होते. दोघेही एकदम तरुण असल्यामुळे त्यांच्यात नजरेचा खेळ सुरु होण्यास अजिबात वेळ लागला नाही. नजरेच्या खेळातून दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. संपर्कातून दोघात प्रेम केव्हा झाले हे त्यांना कळलेच नाही.

प्रेम कितीही लपवून ठेवले तरी ते लपत नसते. पंडीत व त्याची गावातील प्रेयसी यांच्यात देखील असेच झाले. कातोरेवाडी येथील रहिवासी असलेला पंडीत आणि चंगुनाबाईची मुलगी यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस बहरत गेले. एके दिवशी दोघांच्या प्रेमाची भनक चंगुनाबाईला लागण्यास वेळ लागला नाही. आपल्या मुलीचे गावातील पंडीतसोबत सुरु असलेले प्रेम प्रकरण कळताच तिच्या संतापाचा पारावार राहिला नाही. तिने तात्काळ आपल्या मुलीचे लग्न लवकरात लवकर उरकण्याचा निश्चय केला. त्या दृष्टीने ती कामाला लागली. तसेच यापुढे पंडीतच्या नादी लागायचे नाही अशी तिने आपल्या मुलीला तंबी देखील दिली.

मयत पंडित खडके

घरातून आईचे कडवे प्रवचन मिळाल्याची कथा पंडीतला त्याची प्रेयसी अर्थात चंगुनाबाईच्या मुलीकडून समजली. आपल्या प्रेमाला तिव्र विरोध होण्यास सुरुवात झाल्याची जाणीव दोघांना झाली. दरम्यानच्या काळात चंगुनाबाईने आपल्या मुलीचे लग्न लवकरात लवकर समाजातील दुस-या मुलासोबत करण्याची तयारी सुरु केली. हा सर्व प्रकार पंडीत यास समजताच त्याने देखील प्रखर भुमीका घेण्यास सुरुवात केली. जर आपली प्रेयसी आपली होत नसेल तर अन्य कुणाचीही होणार नाही अशा रितीने तो तिच्याशी वागू लागला. हा प्रकार चंगुनाबाईला देखील समजला.  आपल्या मुलीच्या लग्नात पंडीत आडकाठी आणेल याची चंगुनाबाईला जाणीव झाली. त्यामुळे तिने आता टोकाची भुमीका घेण्याचा निर्णय घेतला.

तिच्या पहील्या पतीचा विलास प्रथम गावंडा नावाचा मुलगा होता.  विलास हा पालघर जिल्हयाच्या मोखाडा तालुक्यातील बोटोशी येथील रहिवासी होता. पंडीतचा कायमचा काटा काढण्याचा  प्लान तिने विलास सोबत बोलून दाखवला. आपल्या मुलीचे लग्न सुरळीत पार पडावे व त्यात पंडीतचा त्रास नको असा तिचा विचार होता. त्यातून तिने पंडीतला या जगातून कायमचे संपवण्याचा कुविचार मनाशी केला. विलासचा देखील दोघांच्या प्रेम प्रकरणास विरोध होता.  पंडीत यास पार्टी देण्याच्या बहाण्याने लांब कुठेतरी घेवून जायचे व तेथेच त्याची हत्या करण्याचा प्लान विलासने आखला. याकामी त्याने त्याचे साथीदार तयार केले. कैलास जेठू फसाळे, प्रकाश नवसू झुगरे, राजू रामदास ठोंबरे या तिघांना त्याने तयार केले.

26 मे रोजी विलास गावंडा याने कैलास जेठू फसाळे, प्रकाश नवसू झुगरे, राजू रामदास ठोंबरे यांना सोबत घेतले. चौघांनी मिळून पंडीत यास पार्टीला जाण्याचे निमीत्त करत सोबत घेतले. त्याला पुर्णपणे गाफील ठेवण्यात आले. आपण पार्टीला जात नसून यमाच्या दारी जात आहोत याची किंचीतही कल्पना पंडीत यास आली नाही. 26 मे रोजी सर्व जण वैतरणा रस्त्यावरील ओंडली शिवारात पार्टी करण्याच्या बहाण्याने एकत्र आले. या ठिकाणी निर्जन ठिकाण बघून गाफील पंडीत खडके याचा गळा दाबून त्यास जिवानीशी ठार करण्यात आले. त्याची हालचाल पुर्णपणे बंद झाल्यानंतर त्याचा मृतदेह वन विभागाच्या जंगलात फेकून देण्यात आला. त्यानंतर चौघांनी तेथून पलायन केले.

दुसरा दिवस उजाडला तरी देखील पंडीत घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या आईवडीलांना काळजी लागली. एकामागून एक दिवस जात होते. सात दिवस उलटून गेले तरी देखील पंडीत घरी आलाच नाही. दरम्यानच्या काळात पंडीतच्या आई वडीलांनी त्याचा सर्वत्र शोध सुरुच ठेवला होता. अखेर 1 जुन रोजी पंडीतच्या आईवडीलांनी इगतपुरी पोलिस स्टेशन गाठले.

इगतपुरी पोलिस स्टेशनचे पो.नि. अशोक रत्नपारखी यांना भेटून त्यांनी आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याची व्यथा कथन केली. इगतपुरी पोलिस स्टेशनला या प्रकरणी 13/20 या क्रमांकाने पंडीतच्या बेपत्ता होण्याची मिसींग दाखल करण्यात आली. या मिसींगचा तपास पो.नि. अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. इगतपुरी तालुक्याच्या तळेगाव शिवारातील कातोरेवाडी परिसरातील वन विभागाच्या निर्जन ठिकाणी पंडितचा मृतदेह पडून होता. या मृतदेहाची दुर्गधी परिसरात पसरत होती. या कालावधीत पशुपक्षांनी त्याच्या मृतदेहाचे लचके तोडण्यास सुरुवात केली होती. त्याचा केवळ पाय व कपडेच कुजलेल्या अवस्थेत जेमतेम राहिले होते.

अखेर 11 जून रोजी हा कुजलेला मृतदेह परिसरातील लोकांच्या नजरेस पडला. या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. जालिंदर पळे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंग, अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उप विभागीय पोलिस अधिकारी अरुंधती राणे तसेच  इगतपुरी पो.स्टे.चे पो.नि. अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.जालिंदर पळे व त्यांच्या सहका-यांनी पुढील तपास सुरु करण्यात आला.

मृतदेहाचा तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला 55/20 या क्रमांकाने घोटी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मयताच्या कपड्याच्या वर्णनाच्या तरुणाची कुठे मिसींग दाखल आहे का याची तपासणी करण्यात आली. 1 जून रोजी इगतपुरी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल असल्याची नोंद आढळून आली. मिसींग मधील तरुणाचे व त्याच्या कपड्यांचे वर्णन जुळून येत होते. मिसींग दाखल करणा-या युवकाच्या आईवडीलांना बोलावून त्यांना कुजलेला मृतदेह दाखवण्यात आला. त्या मृतदेहाचे कपडे व पायातील पादत्राणे बघून हा मृतदेह आपला मुलगा पंडीत ढवळू खडके याचा असल्याचे त्यांनी ओळखले.

अशा प्रकारे मयताची ओळख पटली. मयतास कुणी मारले हा पोलिस तपासाचा पुढील भाग होता. मयताचे कुणासोबत काही वाद होते का? त्याचे गावात कुणासोबत प्रेम संबंध होते का? याची तपासणी करण्यात आली. तपासात कातोरेवाडी गावातील चंगुनाबाई गणपत मेंगाळ हिच्या मुलीसोबत मयत पंडीतचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली. दोघांच्या प्रेमसंबंधाला चंगुनाबाई व तिचा मुलगा विलास प्रथम गावंडा यांचा विरोध असल्याची माहिती समोर आली. दोघांना चौकशीकामी बोलावले असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.

अकस्मात मृत्यूच्या चौकशीत सरकारतर्फे हे.कॉ. एस.एस.गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घोटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा घोटी पोलिस स्टेशनला गु.र.न.77/20 भा.द.वि.302, 201, 506, 120 ब, 34 नुसार चंगुनाबाई व तिचा मुलगा विलास यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. त्यांना 14 जून रोजी अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सुरुवातीला पाच दिवसांची कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान या गुन्हयात अजुन तिघांची नावे समोर आली.

कैलास जेठू फसाळे, प्रकाश नवसू झुगरे, राजू रामदास ठोंबरे यांची नावे अटकेतील दोघांनी पोलिसांना कथन केली. त्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. चंगुनाबाईचा मुलगा विलास याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी  पोलिसांसमोर कबुल केले की आम्ही तळेगाव शिवारातील कातोरेवाडी वन विभागाच्या हद्दीत पंडीतला गळफास देवुन मारुन टाकले.

त्यामुळे इतर तिघा संशयीतांना देखील अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. सदर तपास पोलिस अधिक्षक आरती सिंग, अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उप विभागीय पोलिस अधिकारी अरुंधती रणे, इगतपुरी पो.स्टे.चे पो.नि. अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.जालिंदर पळे, सहायक फौजदार अनिल धुमसे, पो.हवालदार गोसावी, खैरनार, पोलिस नाईक गायकवाड, दोंदे, देसले, पो.कॉ. कासार, सानप, महिला पोलिस कर्मचारी ढाकणे, शिंदे, चालक हवालदार भालेराव यांनी परिश्रम घेत पुर्ण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here