मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता कुठेही सुटी सिगारेट अथवा बिडी विकण्यास बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट अथवा बिडी स्मोक करायचीच असेल तर त्यासाठी सिगारेटचे संपूर्ण पाकिट अथवा बिडीचे पुर्ण बंडल विकत घ्यावे लागेल.
व्यसनांच्या दिशेने वाटचाल करणा-या कडे तरुणाईला रोखण्यासाठी हा आदेश काढल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश सरकारने पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.
सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश अर्थात ‘आरोग्याच्या धोक्याची कल्पना’ (धुम्रपान करणे आरोग्यास अपायकारक आहे) हा साध्य होतो. मात्र तो उद्देश सुटी सिगारेट अथवा बिडी विक्री केल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळू शकत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने आता सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले आहे.
केंद्र सरकारकडून यापुर्वी ‘ई-सिगारेट’चे उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 19 सप्टेंबर 2019 रोजी या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. धूम्रपान रोखण्याचा पर्याय म्हणून ‘ई-सिगारेट’कडे पाहिले जात होते. मात्र त्यात अपयश आले आहे.