वय झाले तरी रागीट स्वभाव तसाच राहिला-पत्नीला मारुन फकिरा फासावर लटकला

जळगाव : राग हा शक्यतो नसावा. असला तरी तो क्षणीक असावा. कायमस्वरुपी अथवा रोजची कटकट असलेला राग घातक असतो. क्षणभराचा राग आपले व दुस-याचे आयुष्य उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरु शकतो. रागाचे दुष्परिणाम लवकर लक्षात आले तर मनुष्य त्यातून सावरु शकतो. मात्र वृद्धापकाळ आला तरी मनातून व अंगातून राग जात नसेल तर मात्र ते चुकीचेच असते. उफाळून येणारा राग हा समुद्राच्या लाटेप्रमाणे असतो. रागाची एखादी जोरदार लाट आली तर ती खुप मोठे नुकसान करुन जाते. आग आणि राग शांत झाल्यावरच लक्षात येते की नुकसान किती झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नेहेते या गावी फकीरा वैदकर व कमला वैदकर हे शेतकरी वृद्ध दाम्पत्य रहात होते. फकीरा वैदकर यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहे. त्यामुळे फकीरा वैदकर व त्यांची पत्नी कमला हे दोन्ही आपल्या सर्व जबाबदा-यांमधून मुक्त झाले होते. त्यांनी वडीलोपार्जीत शेती व घराची दोन्ही मुलांमधे वाटणी केली होती. दोन्ही मुले आपापल्या परिवारासह वेगवेगळी रहात होते तर फकीरा व कमला हे वृद्ध दाम्पत्य वेगळे रहात होते. एकंदरीत सर्व काही सुरळीत सुरु राहण्यास काहीच हरकत नव्हती.

मात्र फकीरा वैदकर यांचा स्वभाव मोठ्या प्रमाणात तापट होता. त्यांचे वय 73 वर्ष होते. तरीदेखील त्यांच्या तापट व भांडखोर स्वभावात तसूभर देखील फरक पडला नव्हता. आजची पिढी अशा रागीट व तापट स्वभाव असलेल्या जेष्ठ नागरिकांना जुने खोड म्हणून संबोधतात.

तापट व रागीट स्वभावामुळे फकीरा वैदकर हे पत्नी कमलाबाई सोबत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद घालत असत. त्यांना पत्नीसोबत वाद घालण्यास कोणतेही निमीत्त पुरेसे ठरत होते. वय झाले तरी त्यांना रागावर आवर घालता आला नव्हता. रागीट स्वभावाचे दुष्परिणाम कित्येक लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण मिळवल्याचे उदाहरणे आहेत. मात्र फकीरा वैदकर यांचा “माझेच खरे” हा स्वभाव काही केल्या जात नव्हता.

जरा काही मनाविरुद्ध झाले म्हणजे फकीरा वैदकर हे त्यांची पत्नी कमलाबाईला विळ्याने छाटून टाकण्याची भाषा करत होते. रागीट नवरा कमलाबाईच्या पदरी पडला होता. त्यामुळे ती माऊली बिचारी मुकाट्याने सहन करत होती. मुले मोठी झाली होती. त्यांची लग्ने देखील झाली होती. नातू व नात देखील डोक्याच्या वर गेले होते. तरीदेखील आजोबा झालेले फकीरा यांचा तापट स्वभाव जसा होता तसाच होता.

21 सप्टेबर रोजी भल्या पहाटे नेहमीप्रमाणे दोघा पती पत्नीत कोणत्या तरी कारणावरुन खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी कमलाबाई स्वयंपाक खोलीत इलेक्ट्रीक शेगडीवर आयुष काढा तयार करत होत्या. दोघा पती पत्नीत वादाचे जे काही कारण असेल नसेल त्यावरुन फकीरा वैदकर यांच्या मनात संतापाची एक मोठी लाट उसळली. ज्याप्रमाणे समुद्राची एक जोरात लाट उसळून येते व त्या लाटेत खडक देखील झिजून तुटण्याची वेळ येते तशी अवस्था यावेळी झाली होती.

संतापाच्या भरात फकीरा वैदकर यांनी हातातील विळ्याने आयुष काढा तयार करत असलेल्या कमलाबाईवर वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात कमलाबाईच्या गालावर, तोंडाच्या जबड्यावर व गळ्यावर सपासप वार फकीरा वैदकर यांनी सुरु केले. या अनपेक्षीत हल्ल्यामुळे बेसावध कमलाबाई सुरु असलेल्या इलेक्ट्रीक शेगडीवर धाडकन कोसळल्या. इलेक्ट्रीक शेगडीचा शॉक देखील त्यांना त्याचवेळी लागला.

एकाच वेळी विळ्याचे वार व इलेक्ट्रीक शेगडीचा शॉक असा दुहेरी आघात त्यांच्यावर झाला होता. विजप्रवाह सुरु असलेल्या शेगडीवर कोसळल्यामुळे विजेच्य तारेची अर्थात कॉईलच्या जखमा त्यांच्या छातीवर, पोटावर व मांडीवर झाल्या. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. काही क्षणापुर्वी चालत्या फिरत्या कमलाबाईच्या मृत्यूच्या दाढेत गेल्या. त्यांचा जिव गेला होता. त्या निपचीप पडल्या होत्या. आज त्यांच्या जिवनातील अखेरचा दिवस इतका क्रुर असेल याची त्यांनी कधी कल्पना देखील केली नसावी.

आपल्या हातून हे काय विपरीत घडले याची जाणीव घटना घडून गेल्यावर फकीरा वैदकर यांना आली असावी. क्षणभराचा राग किती नुकसानदायक असतो याचा प्रत्यय या घटनेतून आला. कदाचीत फकीरा वैदकर यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असावा. त्यांनी लागलीच दुस-या खोलीत जावून संतापाच्या भरात अथवा पश्चातापाच्या भरात छताच्या लोखंडी हुकाला दोरीच्या मदतीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. काही क्षणातच दोघे पती पत्नी हे जग सोडून गेले.

काही वेळाने नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावर राहणारी त्यांची नात सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास आजोबा फकीरा यांना पिण्यासाठी दुध देण्यास गेली. त्यावेळी समोरचे आजीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दृश्य बघून ती काही वेळ भांबावली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. ती मनातून प्रचंड घाबरली. तिने तेथून लागलीच पळ काढत हा प्रकार वडील रविंद्र वैदकर यांच्या कानावर घातला.

मुलगी सांगत असलेला प्रकार ऐकून मुलगा रविंद्र देखील काही वेळ बिथरला. त्याने लागलीच लहान भाऊ गणेश वैदकर यास सोबत घेत आई रहात असलेली खोली गाठली. खोलीत दोघा भावांनी आपल्या परिवारासह येवून पाहिले असता त्याठिकाणी त्यांची आई कमलाबाई रक्ताच्या थारोळ्यात इलेक्ट्रीक शेगडीजवळ निपचीप पडलेली होती.

हा भयावह प्रकार बघून दोघा भावांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. भल्या पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार बघण्यासाठी आजुबाजूचे लोक तेथे जमा झाले. शेजा-यांच्या मदतीने त्यांनी कमलाबाईला उचलून सुरक्षीत ठिकाणी हलवले.

त्यानंतर त्यांनी वडील फकीरा वैदकर यांचा शोध घेण्यासाठी दुस-या खोलीत पाहण्याचा प्रयत्न केला. दुस-या खोलीचे दार आतून बंद होते. खिडकीचा दरवाजा बाहेरुन आत लोटून पाहिले असता फकीरा यांनी आत्महत्या केल्याचे दृश्य दिसून आले. गळफास घेत छताला लटकलेल्या अवस्थेत फकीरा वैदकर सर्वांना दिसून आले.

त्यामुळे लोकांच्या मदतीने तो दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवण्यात आला. इतरांच्या मदतीने त्यांना खाली उतरवण्यात आले. त्यांना देखील इलेक्ट्रीक शेगडीचा चटका लागल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग व जखमा उपस्थितांना दिसून आल्या.

आपल्या भांडखोर वडीलांनी आई कमलाबाईचा विळयाने खून करुन स्वत: आत्महत्या केल्याची रविंद्र वैदकर व त्याचा भाऊ गणेश या दोघांची खात्री झाली. या घटनेची माहीती रावेर पोलिस स्टेशनला देण्यात आली.

माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामदास वाकोडे, स.पो.नि. शितलकुमार नाईक व पोलिस उप निरिक्षक मनोज वाघमारे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. मयत दाम्पत्यांचा मुलगा रविंद्र वैदकर याच्या फिर्यादीनुसार रावेर पोलीस स्टेशनला मयत फकीरा वैदकर यांच्या विरुद्ध कमलाबाई वैदकर यांच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूर उप विभागाचे डीवायएसपी, पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक मनोज वाघमारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here