नाथाभाऊंच्या पक्षांतराची राजकीय सौदेबाजी कुणाला फायद्याची ?

खानदेशात भाजपाचे लोकनेते म्हटले जाणारे वजनदार नेते एकनाथराव खडसे यांच्या राजकीय पक्षांतरावरुन सौदेबाजीचा बाजार तेजीत आला आहे. स्वत: नाथाभाऊ चतुर खिलाडी आहेत. राज्याच्या भाजपात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुत्रे आहेत तोपर्यंत नाथाभाऊंचे राजकीय करिअर शुन्यच राहणार हे स्पष्ट झाल्याने नाथाभाऊंनी फासे टाकले आहेत, असे म्हणतात.

बिहार विधानसभा निवडणूकीची सुत्रे देवेंद्र फडणविसांच्या हाती सोपवून पक्ष श्रेष्ठींनी चतुर खेळी केली आहे. बिहारात पुन्हा भाजपाने सत्ता मिळवली तर पुन्हा एकदा फडणविसांचे नेतृत्व मान्य करण्यावाचून राज्यातल्या नेत्यांना दुसरा पर्याय नाही. हे लक्षात आल्यामुळेच की काय फडणविसांच्या ब्राम्हण असण्याचा मुद्दा गाजवण्यात आला. त्यात भर म्हणून नाथाभाऊंनी देखील कधी काळचा हा वाण्या-ब्राम्हणांचा पक्ष आपणच वाढवल्याचे ठासून सांगितले. म्हणजेच नाथाभाऊ भाजपातल्या फडणवीस नेतृत्व विरोधकांचे देखील नेतृत्व करतच होते.

मुखमंत्रीपदाचे आणखी एक स्पर्धक असलेले चंद्रकांतदादा पाटील स्वत:ची समांतर प्रसिद्धी यंत्रणा घेवून मैदानात आहेत. तेच चंद्रकांतदादा पाटील हे नाथाभाऊ भाजपाचे नुकसान करणार नाहीत असेही सांगताहेत. याच दरम्यान नाथाभाऊंकडून रा.कॉ. कडे पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव आल्याच्या मुद्द्यावर रा.कॉ. नेते शरदराव पवार यांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची मते जाणून घेतली.

आपण रा.कॉ. नेतृत्वाच्या संपर्कात नसल्याचे सांगणारे नाथाभाऊ आपणास सर्वच पक्षांकडून ऑफर आल्या असल्याचे देखील सांगताहेत. त्यामुळे नाथाभाऊंची “राजकीय उपयुक्तता” आणी “उपद्रव मुल्य” याची कुणाला किती गरज आहे या मुद्द्याची चर्चा सुरु झाली आहे.

त्याच बरोबर या आठवड्यात दोन घटना समोर आल्या. त्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विषय एका फेक न्यूजद्वारे समोर आणला गेला. तर भाजपाचे बडे नेते प. दिनदयाल उपाध्याय यांच्या संबंधी अजीत दादांनी ट्विटरवर दिलेला संदेश सुचक इशारा देवून गेला. दिवंगत नेत्यांबद्दल चांगल बोलण्याची संस्कृती असल्याचे स्पष्टीकरण दादांनी केलय. युक्तीवादासाठी दादांचा मुद्दा बिनतोड आहे. तथापी स्पर्धक राजकीय पक्षाच्या पुर्वजांबद्दल हा जास्तीचा प्रेमाचा उमाळा बाधक ठरणार तर नाही ना? याचा विचार कुणी करायचा? त्यामुळे रा.कॉ. पक्षांतर्गत भाजपाशी दोन हात करणारी भक्कम फळी उभारण्याची तयारी केव्हाच सुरु झाली आहे. त्याचा एक भाग म्हणूण नाथाभाऊंच्या रा.कॉ. प्रवेशावर मत मतांतरे जाणून घेण्यात आली.

नाथाभाऊंच्या सोबत भाजपातून कोण कोण किती आमदार येवू शकतात याची देखील चाचपणी होत आहे. चर्चा तर अशी आहे की दावा केल्याप्रमाणे 15 ते 30 आमदार रा.कॉ. त आणल्यास नाथाभाऊंना आजच मंत्रीपदाची खुर्ची बहाल करावी लागेल. त्यासाठी विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग खुला करावा लागेल. ते जमले नाही तर खानदेशातील एका आमदाराला राजीनामा द्यायला लावून भाऊंना विधानसभेवर आणावे लागेल. यासाठी जळगाव, भुसावळ किंवा मुक्ताईनगर मतदारसंघ रिकामा करण्याची उपाययोजना होवू शकते.

भाजपातून आयात केलेल्यास मंत्रीपदी बसवणे दुस-या फळीतील सहन होणार नाही. त्यामुळेच जिल्ह्यातून नाथाभाऊंच्या रा.कॉ. प्रवेशालाच तिव्र विरोध दर्शवण्यात आला. या विरोधाचा भाग म्हणून त्यांच्या कुटूंबात स्नुषा असणारी भाजपाची खासदारकी, जिल्हा बॅंक चेअरमनपदासह महानंद डेअरी चेअरमनपद रा.कॉ. च्या इतर नेत्यांसाठी मोकळे करण्याचा मुद्दा पुढे रेटण्यात आल्याचे समजते. तथापी भुसावळचे आ. सावकारे मंत्रीपद दिल्यावरही त्यांनी रा.कॉ. शी गद्दारी करत भाजपाचा हात धरला याकडे लक्ष वेधण्यात आले. रा.कॉ. चे दोन माजी मंत्री पक्षाची मजबूत फळी उभारण्यात कमी पडले. त्यांनी अन्य किती कार्यकर्त्यांना वाढवले? किती नवे जोडले की घरच्या तिजोरीची उंची वाढवण्यात धन्य जाहले? याची देखील मुंबईत चर्चा रंगली.

नाथाभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना तिन्ही पक्षांची ऑफर आहे. रा.कॉ. प्रमाणे तगडा पक्ष शिवसेनेशी युती तोडल्याबद्दल नाथाभाऊंवर प्रचंड राग व्यक्त करणारा पक्ष. हा राग इतका की, युती तोडणा-यांनी 7 नव्हे तर 700 पिढ्यांची सोय करण्याइतकी कमाई केल्याचा “बंपर” आरोप केलेला. तिथे आदरणीय उद्धवजी यांचे पर्यंत पोहोचण्याआधी म्हणे मिलींद मर्जी संपादन करावी लागते.

अलीकडे त्रिकालदर्शी संजयजी यांचे महत्व वाढले आहे. शिवाय युवा नेते आदित्य ठाकरे यांचे वाढते वलय लक्षात घ्यावे लागते. शिवाय शिवसेना हा भक्कम विचारधारेचा “आदेश” देणारा पक्ष आहे. त्यात प्रवेश म्हणजे “शिवबंधन” बांधणे आलेच. तिथे “आवाज कुणाचा?” “शिवसेनेचा” एवढीच गगनभेदी गर्जना घुमते. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई, मराठी जनतेप्रती समर्पण आणि जाज्वल्य हिंदुत्व यासाठी शिवसेना नेतृत्वाचाच आदेश शिरसावद्य मानला जातो. नाथाभाऊंच्या स्वभाव प्रकृतीला हे सारे झेपेल काय?
आता उरला सुरला कॉंग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्यात कमजोर. महाराष्ट्राचे सारे निर्णय दिल्लीत ठरणारा पक्ष. तेथेही केंद्रीय अध्यक्षपदाचे धुमशान आहे. 23 नेत्यांनी आवाज उठवून पाहिला. त्यांचे काय होतेय ते समोर आहेच. त्यामुळे नाथाभाऊंना जवळचा वाटणारा रा.कॉ. चा पर्याय दिसतो.

रा.कॉ. चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांनी ठरवलेच तर नाथाभाऊंचा या पक्षात प्रवेश होवू शकतो. भाजपाचे घर तोडण्यासाठी रा.कॉ. ला सध्या तोडफोड करणा-यांची गरज आहे. हे काम फडणविसांसोबत 80 तासांचे सरकार बनवणारे अजीतदादा करु शकणार नाहीत हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

नाथाभाऊ यांचे राज्य भाजपातील महत्व आणी स्थान सध्या नगण्य करण्यात आल्याचे दिसते. तरीही कोरोना-लॉकडाऊन मजुरांची बेरोजगारी-पलायन-आर्थिक मंदी अशी संकटे असतांना देखील नाथाभाऊ वृत्तपत्रे-चॅनल्सच्या न्युजमधे कायम राहिले. त्यांच्यावरील अन्यायाविरुद्धचा एकच मुद्दा त्यांनी जोरदार तापवला. शिवाय “अश्लील क्लिप्स” चा हुकुमी एक्का बाहेर काढून भाजपाच्या अनेकांची झोप उडवली. त्यामुळे नाथाभाऊ त्यांचेवर पलटवार करणा-या भाजपा नेत्यांनाही कसे दमात घेवू शकतात हे महाराष्ट्र रोज बघत आहे.

नाथाभाऊंची शेकडो स्वभाव वैशीष्ट्ये आहेत. काहींना ते उपयुक्त नेते वाटतात तर काहींना उपद्रवकारी! आपल्या अंगभूत प्रचंड सामर्थ्यांचा नाथाभाऊ भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेसशी राजकीय अंतर ठरवतांना चाणाक्षपणे वापर करतीलच असे म्हटले जाते. भाजपाकडून “इडी” चा “दगाफटका” होणार नाही याचाही हिशेब मांडला जाईल. तोपर्यंत नाथाभाऊंचे पक्षांतर हे मृगजळ ठरुन कुणाला हुलकावणी देते त्याची प्रतिक्षा !

सुभाष वाघ (पत्रकार-जळगाव)

8805667750

subhash-wagh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here