महिला डॉक्टरचा विनयभंग ; जम्बो कोविड हॉस्पीटल पुन्हा चर्चेत

काल्पनिक छायाचित्र

पुणे : सुरु झाल्यापासून वादात सापडलेले पुणे येथील जम्बो कोविड हॉस्पीटल आता महिला डॉक्टरच्या विनयभंगामुळे पुन्हा एकवेळ चर्चेत आले आहे. या हॉस्पीटलमधील दोघा डॉक्टरांवर शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

२५ वर्षाच्या महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश भद्रा व अजय बागलकोट या दोघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला डॉक्टर व आरोपी डॉक्टर हे जम्बो हॉस्पिटलमध्ये कामाला असून दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टर ड्युटीवर असताना तिच्यासोबत या दोघा डॉक्टरांनी अश्लिल वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. मागील एक महिन्यांपासून डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार सुरु असल्याचे तिचे म्हणणे आहे. सदर बाब या महिला डॉक्टरने हॉस्पीटल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती़. तरीदेखील डॉक्टरांकडून तिचा विनयभंग केल्यामुळे पिडीत महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला.

रुग्णाच्या उपचारात हेळसांड झाल्या प्रकरणी हे रुग्णालय चर्चेत आले होते. गेल्या आठवड्यात येथे दाखल रुग्ण महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर डिस्चार्ज देण्यात आला होता़. रुग्ण महिलेच्या आईने हॉस्पिटलबाहेर उपोषण केल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला होता. पोलिसांना ती रुग्ण महिला शनिवारी पिरंगुट घाटात आढळून आली होती़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here