जळगाव : एका वर्षासाठी हद्दपार असलेला रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (अजमेरी गल्ली तांबापुरा-जळगाव) यास त्याच्या राहत्या घरातून रविवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला घरात लपवून आश्रयाची देण्याची मदत करणार्या त्याच्या आईवडीलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा भागातील अजमेरी गल्लीतील रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याला एका वर्ष कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहे.
हद्दपारीचे आदेश जारी झाले असतांना काल्या घरी आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना गुप्त बातमीदाराकडून समजली होती. त्यांनी तात्काळ सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, सपना येरगुंटला अशांचे एक पथक तयार केले.
काल्या यास अटक करण्याकामी पोलिस पथक रविवारी रात्री त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्याचे वडील गयासोद्दीन व आई जाकियाबी यांनी पथकाला उत्तर देतांना काल्या घरी नसल्याचे सांगितले होते. पोलिस पथकाने त्यांच्या घराची तपासणी केली असता काल्या घराच्या वरच्या मजल्यावर मोठ्या चटईच्या मागे लपलेला होता.
हद्दपार काल्या यास पथकाने लागलीच शिताफीने अटक केली. त्याला आश्रय देणा-या त्याच्या आई वडीलांना देखील पथकाने आज अटक केली आहे. त्याला आश्रय दिल्याप्रकरणी काल्याचे आई वडील गयासोद्दीन शेख व जाकीयाबी शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. हटकर व शिकलकर या दोन्ही गटात झालेल्या दंगलीत आता काल्या गोवला जाणार आहे.