धुळे : धुळे तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका पुनम प्रकाश ठाकरे यांना आज सोळा हजार रुपयांची लाच घेणे महागात पडले. खाजगी कंत्राटदाराने विविध विकासकामे केल्याच्या बिलापोटी चेक देण्याकामी मोबदला म्हणून त्यांना 16 हजार रुपयांची लाच घेतांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने सोनेवाडी ग्रामपंचायतीत खळबळ माजली आहे. खाजगी कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने गावातील दोन घरकुल, सात शौचालय, भूमिगत गटारीचे बांधकाम केले आहे. या बांधकामाचा धनादेश (चेक) काढून देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेविका पूनम ठाकरे यांनी तक्रारदाराकडे 16 हजार रुपयांची लाच मागीतली होती. तशी तक्रार एसीबीकडे दाखल करण्यात आली होती. त्या दृष्टीने सापळा रचला असता त्या सापळ्यात पंचांसमक्ष लाच घेतांना ग्रामसेविका अडकल्या.
सदर सापळा यशस्वी करण्यासाठी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर आदींच्या पथकाने परिश्रम घेतले.