औरंगाबाद : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी सध्या एनसीबीचे तपाससत्र सुरु आहे. दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद शहरातील पंचवटी चौकात चरस व एमडी (मॅफोड्रोन) ड्रग्जचा मोठा साठा वेदांतनगर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद, असिक अली मुसा कुरेशी अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
मुंबई येथून औरंगाबाद शहरात चारचाकी वाहनातून आणलेला एमडी ड्रग्ज आणि चरसचा साठा आज मंगळवारी वेदांतनगर पोलिसांनी पंचवटी चौकातून जप्त केला. हा ड्रग्ज साठा शहरात विक्रीसाठी आणला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचवटी चौकात सापळा रचून अडवण्यात आलेले चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात एमडी नावाच्या ड्रग्जच्या 13 पुड्या, चरस या अंमली पदार्थाच्या 25 पुड्या आढळून आल्या. काळ्या बाजारात या मुद्देमालाची किंमत एक कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेत अटक करण्यात आली असून पुढील तपास वेदांत नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. रामेश्वर रोडगे व त्यांचे सहकारी करत आहेत.