जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या 116 व्या जयंती निमित्त जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिलभाऊ जैन, संचालिका सौ. ज्योती जैन, सौ. अंबिका जैन, गिता धर्मपाल, डॉ. जॉन चेल्लादूराई आदी प्रत्यक्ष हजर होते. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी या प्रसंगी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पार्पण करण्यात आले. दीप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक निखील क्षिरसागर, सारंग यांनी गांधीजींना प्रिय असलेले वैष्णव जन…… हे भजन गायले. गांधी रिसर्च फाऊंडेशन व त्यांचे गांधी विचार प्रचार प्रसाराचे कार्यविस्ताराविषयी सौ. अंबिका जैन यांनी प्रास्तविकात विचार व्यक्त केले.
ऑनलाईन पद्धतीने गांधी विचार आजच्या कठिण काळातदेखील किती महत्त्वपूर्ण आहेत याबाबत डॉ. अनिल काकोडकर, तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोकभाऊ जैन यांनी विशद केले. सौ. ज्योती जैन यांनी विश्व अहिंसा दिनानिमित्त उपस्थितांना अहिंसेची प्रतिज्ञा दिली. गांधी तीर्थ लवकरच व्हर्चुअल होत असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी व्हर्चुअल टूरसाठी टिझर लॉंच करण्यात आले. आश्विन झाला यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे थेट प्रसारण ‘गांधी तीर्थ’ सोशल मीडिया पेज https://www.facebook.com/gandhiteerth/live/ या https://youtu.be/AUJHAHP-ImA ला सकाळपासून सुरु करण्यात आले. दुपारपर्यंत जगभरातुन 10 हजाराच्यावर लोकांनी गांधी तीर्थच्या सोशल मीडिया पेजला भेट दिली. कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रिकरण या सोशल पेजवर अजुनही बघता येणार आहे.
गांधी विचारातूनच सध्याचे संकट कमी करता येईल- डॉ. अनिल काकोडकर
सध्या कोविड-19 च्या संकटामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे स्थलांतरदेखील वाढले आहे. ही वस्तुस्थिती समोर असताना संतुलीत ग्रामिण व्यवस्था निर्माण करण्याचे गांधीजींचे स्वप्न आज महत्त्वपूर्ण ठरले असते ही जाणीव यानिमित्ताने होते. महात्मा गांधीजींच्या ग्रामस्वराज्यावर भर देणारे विचार आजही शाश्वत असल्याचे दिसून येते. महात्मा गांधीजींच्या विचार व संस्कारांवर आजही चालल्यास एक स्वस्थ, संतुलीत भारत देश घडविता येईल. यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे महत्त्वाचे आहे.
एकांतवास म्हणजे तपस्या – तुषार गांधी
महात्मा गांधीजींनी येरवडा तुरुंगाला मंदीर म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे त्याठिकाणी राहून बंदीवासातील वेळेचा सदुपयोग त्यांनी ज्ञानात भर घालण्यासाठी केला. एकांतवास म्हणजे स्वतला जागृत करणे अशी गांधीजींची धारणा होती. लिखाण, वाचनासह जे जे चांगले करता येईल तो तो विचार गांधीजींनी त्यावेळी केला. त्यामुळेच चांगले जीवन जगता आले. सध्या कोविड – 19 मुळे आयसोलेशन व्हावे लागत आहे. मात्र महात्मा गांधीजींच्या एकांतवासाच्या विचारांतून प्रेरणा घेतली तर स्वस्थ भारत नक्कीच घडू शकतो असा संदेश गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी यावेळी दिला.
गांधीजींच्या विचारांतूनच भवरलालजींनी कृषी संस्कृतीत केले परिवर्तन- डॉ. सुदर्शन अय्यंगार
“महात्मा गांधीजींच्या तत्त्वांवर आधारित भवरलालजी जैन यांची विचार सृष्टी” या विषयावर ज्येष्ठ गांधीयन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी यावेळी ऑनलाईन मार्गदर्शन उपस्थीतांना केले. ते म्हणाले की सध्याची परिस्थीती अतिशय कठिण आहे. असे असले तरी हिम्मत आणि धैर्याने काम केल्यास या संकटावर मात करता येईल. अनेक कठिण प्रसंगात गांधीजींचे मुल्य जपणे म्हणजे साधारण कार्यातून सामाजिक दायित्वासह असाधारण कार्य करण्यासारखेच आहे. हे कार्य भवरलालजी जैन यांनी केले आहे. व्यक्ती, समाज आणि सृष्टी यांच्यात परिवर्तन घडवण्याचे काम भवरलालजी जैन यांनी कृषी संस्कृतीला विज्ञानाची योग्य ती जोड देवून केले आहे. शेतकऱ्यांना त्यांनी तंत्रज्ञान दिले. यातून गांधीजींच्या ग्रामिण अर्थ स्वातंत्र्याचा मुलमंत्र जपण्यात आला. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, बंधुता, न्याय या गांधीजींनी दिलेल्या जीवनमूल्यांवरच भवरलालजी जैन यांनी आपले कार्य केले आहे. भवरलालजी जैन यांनी संस्कारित केलेला अपरिग्रहाचा वारसा जैन परिवार व जैन परिवारातील प्रत्येक सदस्य जपत आहे.
महात्मा गांधीजींचे विचार शाश्वत- अशोकभाऊ जैन
प्रासंगिक संदेश देताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैली व सध्याच्या काळात देखील महात्मा गांधीजी यांचे विचार शाश्वत आहेत. संकटाची परिस्थिती सुरु आहे. मात्र हताश, निराश न होता नैतिक मुल्ये जपत सामाजिक दायित्वाची जबाबदारी घेवून पुढे पुढे मार्गक्रमण करणे म्हणजे गांधीजी यांच्या विचारांवर मार्गक्रम करणे आहे. हा प्रयत्न वडिल भवरलालजी जैन यांनी केला आहे. तोच प्रयत्न जैन परिवार देखील करत आहे. गांधी विचारातुनच देशातील उत्पादकांचा भूमिपुत्रांना योग्य तो लाभ होण्यासाठीच जैन इरिगेशन प्रयत्नशील असल्याचे अशोकभाऊ जैन यांनी म्हटले.
महात्मा गांधी जयंती ला चरखा जयंती असे देखील म्हटले जाते. चरखा जयंती म्हणून देखील गांधी जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या प्रांगणात दिवसभर अखंड सूतकताई करण्यात आली. या सुतकताईमधे फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला.