पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी राजेश पाटील याने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज अचानक काढुन घेतला आहे. जामीन मिळण्यासाठी दाखल अर्ज फेटाळला जाण्याच्या भीतीने त्याने तो काढून घेतल्याचे म्हटले जात आहे. हा अर्ज काढून घेतल्यामुळे या हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अजून एका वर्षाची मुदतवाढ पनवेल सत्र न्यायालयाला दिली आहे.अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी व महेश फळणीकर आरोपी आहेत. या खटल्यातील साक्षीदारांची ओळख परेड व उलट तपासणी पनवेल सत्र न्यायालयाकडून मागील वर्षी सुरु करण्यात आली होती.
यातील मुख्य साक्षीदार अश्विनी बिंद्रे यांचे भाऊ आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण झाली आहे. पती राजू गोरे यांची उलट तपासणी अद्याप सुरु आहे. खटल्याचे कामकाज ऑक्टोबरपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोरोना संक्रमाणाच्या कारणामुळे खटल्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात मिळाली आहे. खटल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या राजेश पाटील याने जामिनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळला जाण्याच्या भितीने काढून घेतला असल्याचे म्हटले जात आहे.