कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस स्टेशनसमोरच हे हत्याकांड घडले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
मनीष शुक्ला यांच्या हत्येनंतर भाजपा नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचे आवाहन केले आहे. राज्यपाल जयदीप धनखड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी चर्चेसाठी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना राजभवनात बोलावले आहे.
मनीष शुक्ला हे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास टीटागढ पोलीस स्टेशन समोर असलेल्या भाजपा कार्यालयात बसले होते. दरम्यान दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी शुक्ला यांच्या बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले शुक्ला जमीनीवर कोसळले. त्यांना तात्काळ बॅरेकपूरच्या बी.एन. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त प्रमाणात खालावल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मयत घोषीत केले.