जळगाव : जळगाव औद्योगीक वसाहतीमधील स्वामी पॉलीटेक या कंपनीत 2 ऑक्टोबर रोजी धाडसी घरफोडी झाली होती. या घटनेत एकुण 20,68,740/- रुपयांची घरफोडी झाली होती. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केली आहे.
दिनांक 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावने तिन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात सुमारे सहा फुट उंच व चेह-याला मास्क लावलेल्या इसमाने ही घरफोडी केली होती.
आरोपीने घटनेच्या वेळी कंपनीच्या ऑफीसमध्ये वासुदेव उर्फ विक्की विजु पमनानी यांच्या काचेच्या कॅबीनमध्ये उडी मारुन प्रवेश केला होता. कॅबीनमधील लाकडी कपाटाच्या दरवाजाचे लॉक तोडून त्यातील पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीतील 12,68,000/- रुपये आरोपीने चोरी करुन नेले होते.
तसेच फॅक्टरी मालक भरत हरीषकुमार मंधान यांच्या ड्रावर मध्ये ठेवलेले 8,00.740/- रुपये देखील चोरुन नेले होते. एकुण 20,68,740/- रुपये त्याने चोरुन नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला भरत हरीषकुमार मंधान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्याची माहिती समजताच घटनास्थळी सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी भेट दिली होती. गुन्हा उघडकीस आणण्याबाबत त्यांनी योग्य त्या सुचना सह्का-यांना दिल्या होत्या. घटनास्थळी श्वान पथक व अंगुलीमुद्रा पथक देखील बोलावण्यात आले होते. श्वान पथकाने श्रध्दा पॉलीमर पर्यंत मार्ग दाखवला होता.
या ठिकाणी आरोपीचे फिंगर प्रिंट मिळुन आले होते. आरोपी सीसीटिव्ही फुटेज मध्ये कैद झाला होता. या फुटेजच्या आधारे तसेच पो.ना. इम्रान अली सैय्यद यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार चोरी करणारा इसम हा अरविंद अरुण वाघोदे (22) रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक, ता. मोताळा, जि. बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव असल्याचे निष्पन्न झाले होते.
तेव्हा पासुन त्याचा शोध सुरु होता. दि. 4 ऑक्टोबर रोजी बोदवड परीसरातील जंगलात तो लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना समजताच त्यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फोजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. सतिष गर्जे अशांचे पथक तेथे रवाना केले.
आरोपी बोदवड गावानजीक असलेल्या जंगलात विहीरीच्या आडोशाला लपून बसला होता. त्यास मध्यरात्री अडीच वाजता शिताफीने ताब्यात घेण्यत आले. त्याच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता त्यामधे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 9,08,300/- (नऊ लाख आठ हजार तिनशे रुपये) मिळून आले.
ती रक्कम गुन्हयाकामी जप्त करण्यात आली. आरोपी अरविंद वाघोदे यास अटक करण्यात आली. या कारवाईच्या वेळी फिर्यादीचा भाऊ सागर मंधान हे देखील पोलीसांसमवेत हजर होते.
अटकेतील आरोपीस न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 8 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता गिरीष बारगजे यांनी पोलीस कस्टडी मिळण्याकामी युक्तीवाद केला.
या गुन्हयाचा तपास एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 72 तासात पुर्ण केला. या गुन्ह्यातील उर्वरीत 11,50,640/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याचे काम बाकी आहे.
गुन्हा घडताच आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आले होते. आरोपीतावर यापुर्वी धामणगाव बढे. ता. मोताळा, जि. बुलढाणा याठिकाणी बैल चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून एमआयडीसी परिसरातील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामाचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पुर्ण करण्यात आली. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक अमोल मोरे व पो.हे.कॉ. रतीलाल पवार करत आहे.
आरोपीच्या आईकडून दहा हजार रुपये जप्त करण्यात आल्याचे समजते. चोरीच्या पैशातून त्याने अनेकांची उधारी दिली असल्याचे समजते.