राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

जालना : जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे अधिका-यांसोबत बैठकीला हजर असतांना आज एका शेतकऱ्याने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. विलास आठवले असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शेतकऱ्याचे नाव असून तो सेवली या गावाचा रहिवासी आहे.

सेवली परिसरात शेतकरी विलास आठवले यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर काही लोकांनी आपला हक्क सांगून ती शेतजमीन बळकावली असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करून देखील या संदर्भात शुन्य कारवाई असल्याचे निवेदन देण्यासाठी शेतकरी आठवले जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

या वेळी पालकमंत्री राजेश टोपे यांची आढावा बैठक सुरु होती. यावेळी आठवले यांनी जमिनीवरील कब्जा केल्याचा आरोप केला. दरम्यान त्यांनी बाटलीतील विष तोंडात ओतून ते प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावली. पोलिसांनी विलास आठवले यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here