तरुणाच्या खून प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

जळगाव : काल रात्री जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरात झालेल्या खून प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.

सोमवार दि. 5 ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुध फेडरेशन नजीक एका चिकन विक्रेत्याच्या गाडीजवळ ही घटना घडली. हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल (31) रा.इंद्रप्रस्थ नगर जळगाव तसेच अरुण हरी पवार (45 ) रा.के.सी.पार्क,कानळदा रस्ता, जकात नाक्याच्या मागे हे दोघे एकमेकांना परिचीत होते.
हरिश्चंद्र अटवाल यास मद्यपान करायचे होते. त्यासाठी त्याने अरुण पवार यास दारुची बाटली दुकानावरुन घेवून येण्यासाठी दुचाकीची मागणी केली. मात्र दुचाकी देण्यास अरुण पवार याने हरिश्चंद्र यास नकार दिला.

नकार मिळताच हरिश्चंद्र यास राग आला. रागाच्या भरात त्याने अरुण पवार यास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्र्कार दुध फेडरेशन परिसरात घडला. संतापाच्या भरात हरिश्चंद्र याने अरुण याच्या डोक्यात फरशी मारली. फरशीचा मार लागल्यामुळे अरुण गंभीर जखमी झाला.

वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मयत घोषित केले. जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने फरार हरिश्चंद्र याचा शोध घेवून त्याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला मयत अरुण हरी पवार याची पत्नी रत्नाबाई अरुण पवार हिच्या फिर्यादीनुसार रितसर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 168/20 भा.द.वि. 302,323,504 नुसार नोंद करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक अरुण निकम व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here