मुंबई : गैर मार्गाने टीआरपी मिळवण्यासाठी कार्यरत असलेल्या दोघा मराठी चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याचे म्हटले जात आहे. बदनामी करून पैसे देऊन टीआरपीसोबत छेडछाड करण्यात आल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स या रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी केली जाणार आहे.
“फक्त मराठी” आणि “बॉक्स सिनेमा” या दोघा मराठी चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. बनावट टीआरपीचे रॅकेट मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकाने उघड केले आहे. घरात विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याच्या प्रकरणात हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून रक्कम देण्यात आली होती. “फक्त मराठी”, “बॉक्स सिनेमा” आणि रिपब्लिक टीव्ही हे तीन चॅनेल आरोपीच्या घरात आहेत.
रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजावले जाणार आहेत. सहभागी असणाऱ्या सर्वांवर अटकेची टांगती तलवार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने या प्रकरणी तपास सुरु आहे. यात रिपब्लिक टिव्हीने देखील अशा पद्धतीने प्रकारे टीआरपी वाढवल्याचा संशय व्यक्त केला जत आहे. अन्य चॅनेलबाबतीत देखील चौकशी सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे.