टीआरपी प्रकरण – ‘रिपब्लिक’च्या अजून तिघांची होणार चौकशी

मुंबई : बनावट टीआरपी रेटिंगद्वारे करोडॉ रुपयांच्या जाहिराती मिळवून फसवणूक प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चॅनलच्या अजून तिघा अधिकाऱ्यांना आज शनिवारी समन्स बजावण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी यांना उद्या रविवारी 11 ऑक्टोबर रोजी सकाळी गुन्हे शाखेकडे हजेरी लावायची आहे.

मुख्य वित्तीय अधिकारी शिव सुंदरम यांनी चौकशीकामी हजेरी लावण्याबाबत पत्राच्या माध्यमातून असमर्थता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

रिपब्लिकसह अन्य दोघा लहान टी.व्ही. चॅनेलवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंबंधी चॅनलच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलिसांनी ‘सीएफओ’ शिव सुंदरम यास शुक्रवारी समन्स बजावले होते. त्यांनी हजर होण्याऐवजी पत्र लिहून मुदतवाढ मागून घेतली.

चौकशीकामी आपण पुर्ण सहकार्य करण्यास तयार असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचीकेवर लवकरच आगामी आठवड्यात सुनावणीची शक्यता आहे. ती सुनावणीपर्यंत आमच्यापैकी कुणाची चौकशी करु नये असे त्यांनी पत्रातून गुन्हे शाखेला कळवले. तसेच आपण व्यक्तीगत कारणामुळे मुंबई बाहेर असल्याचे देखील शिव सुंदरम यांनी म्हटले आहे.

त्यामुळे पोलिस अधिका-यांनी इतर तिघांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. रिपब्लिक चॅनलच्या इतर तिघा अधिका-यांना समन्स बजावून चौकशीकामी बोलावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here