अमरावती : अमरावती शहर एलसीबीच्या पथकाने यवतमाळच्या क्रिकेट बुकीचा अमरावती येथील अड्डा काही दिवसांपुर्वी नेस्तनाबुत केला होता. याप्रकरणी पाच पैकी चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. या सट्टयातील मुख्य बुकी नागपुर शहरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्या दृष्टीने हालचाली गतीमान करण्यात आल्या. यातील आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुख्य सूत्रधार, सुमित शंकर नागवाणी (३५) पिरॅमीड सिटी फ्लॅट २०४ जरीपटका नागपूर, रॉकी रमेशलाल अलवाणी (३३) जरीपटका, नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयपीएल क्रिकेट बुकींचे यवतमाळ, अकोला, अमरावती या शहरासह नागपुर येथे देखील कनेक्शन असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.