एलएलबीच्या परिक्षेला गैरहजर, तरी उत्तीर्ण – प्राचार्य, प्राध्यापिकेविरुद्ध गुन्हा

नवीन पनवेल : कायद्याच्या परिक्षेला हजर नसतांना देखील विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा प्रकार पनवेलमधील महाविद्यालयात घडल्याचे उघड झाले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश साखरे तसेच तत्कालीन सहायक प्राध्यापिका मालती गाडे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला फसवणुकीसह इतर कलमानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नविन पनवेल येथील शेडुंग टोलनाक्याजवळ सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ संलग्न विधी कायदा अभ्यासक्रम शिकवण्यात येतो.
मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयामार्फत परिक्षा घेण्याचे परिपत्रक १७ मे २०१८ रोजी प्रसिद्ध केले होते. या महाविद्यालयाच्या दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी बाबाजी रंभाजी भोर हा कोणत्याही परिक्षेला बसला नव्हता. तरीदेखील तो विधी कायद्याची दुस-या वर्षाची परीक्षा पास झाला आहे.

नकली सर्टिफिकेट बनवून फसवणूक केल्याची तक्रार सागर कांबळे यांच्या वतीने २७ मे २०१९ रोजी तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. तब्बल १६ महिन्यांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एलएलबी सेमिस्टर 4 चे चार पेपर घेण्यात आले होते. तसेच एलएलबी सेमिस्टर ३ च्या एटीकेटीच्या चार पेपरची परीक्षा घेण्यात आली होती. अशा एकूण आठ पेपरच्या परीक्षेला बाबाजी भोर गैरहजर होता. तरीदेखील त्याला हजर दाखवण्यात आले होते. त्याच्या हजेरी पटात खाडाखोड करण्यात आली होती. त्याच्या निकालाचे शेवटचे पान बदलून त्यावर त्याचे नाव व गुण सादर करण्यात आले होते. त्यावर प्राचार्यांचा सही व शिक्का मारण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here