जळगाव : कोरोना बाधित रुग्णांची आरोग्य सेवा बजावत असतांना डॉ. कल्पेश गांधी हे कोरोनाबाधित झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या कोविड रुग्णाला प्लाझ्मा दान करुन त्यांनी तरुणाईपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना काळात सेवा बजावत असतांना अतिशय व्यस्ततेत त्यांनी नुकतेच इंडीयन रेड क्रॉस रक्तपेढीत प्लाझ्मा दान करण्याहे कार्य केले आहे.
डॉ. कल्पेश गांधी हे इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे नियमित रक्तदाते आहेत. कोरोनामुक्त झालेल्या तरुणांनी आपण समाजचे काहीतरी देणे लागतो या जाणीवेतून, मनात कुठलीही भीती न बाळगता प्लाझ्मा दान चळवळीस सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन डॉ. कल्पेश गांधी यांनी केले.
याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटीचे रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. अनिल चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल भोळे, तिलोत्तम जोशी, जनसंपर्क अधिकारी सौ उज्ज्वला वर्मा व रक्तपेढी चैअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी आदी उपस्थित होते.
कोरोना काळात रुग्णसेवा, कोरोना बाधित ते कोरोना मुक्त, पुन्हा रुग्णसेवा असा प्रवास करणा-या डॉ. कल्पेश गांधी यांच्या कार्याला रेड क्रॉसच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. प्लाझ्मा दानाची चळवळ बळकट करण्याचे आवाहन रक्तपेढीचे चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनी यांनी यावेळी केले.