देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागांना स्वतंत्र ध्वज देण्यात आले आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. यामुळे राज्य वनविभागाची नवी ओळख तयार होईल. वनविभाग वने आणि वन्यजिवितांचे संरक्षण करते. याशिवाय पर्यावरण आणि जैव विविधता अबाधित राखण्याकामी वन विभागाची भुमिका महत्वाची ठरते.
देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्मीतीसाठी वनविभागाची भुमिका आहे. तसेच पर्यटनक्षेत्रात देखील वनविभागाकडून कामगिरी बजावली जात आहे. जंगलाचे वैभव जतन करण्यासाठी वन अधिकारी, वन कर्मचारी कार्यरत असतात. आता या वन विभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे.
वनविभागाचा ध्वज हा हिरव्या आणि लाल रंगाचा आहे. या ध्वजात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीदवाक्य अंकित करण्यात आले आहे. सन १९८८ च्या राष्ट्रीय वन नीतीमध्ये हिरवा रंगाचा ‘सिम्बॉल’ वनविभागाला मिळाला आहे. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा सोनेरी आहे. वने, जल, वायू, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा सुवर्ण रंग ठेवण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या आयएफएस अधिकाऱ्यांच्या वाहनांवर हा ध्वज लावला जाणार आहे. सरकारी कार्यालयात देशाचा तिरंगा आणि वनविभागाचा ध्वज असे दोन्ही लावले जातील. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात टेबलवर हा ध्वज लावण्याची मुभा राहील. लवकरच या ध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.