प्रतिशोधाच्या अग्नीत धम्मा पुरेपुर अडकला ; कैफला मारुनच त्याचा आत्मा गार पडला

जळगाव : भुसावळ शहरातील पंचशील नगर भागात मोहम्मद कैफ हा सतरा वर्षाचा तरुण रहात होता. कैफ याच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. त्याचे वडील व भाऊ दिवसभर रस्त्यावर कपडे विकून आपला चरितार्थ चालवतात. एक भाऊ रेल्वे प्लॅटफॉर्मवर ठेकेदाराच्या हाताखाली खाद्यपदार्थ विकण्याचे काम करतो. अशा जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या परिवारातील कैफ या तरुणाच्या अंगी भलता जोश होता. त्याला पटकन राग देखील येत असे. त्या संतापाच्या भरात तो प्रसंगी मारहाण करण्यास देखील मागेपुढे बघत नव्हता.

कैफ रहात असलेल्या पंचशील नगर भागात त्याच्याच वयाचे काही तरुण रहात होते. धम्मा सुरळकर, समिर बांगर, आश्विन बांगर व शुभम खंडेराव अशी त्या तरुणांची नावे होती.

एके दिवशी धम्मा सुरळकर या तरुणाच्या वडीलांसोबत कैफचा कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्या वादाच्या व संतापाच्या भरात अंगी जोश असलेल्या कैफने धम्मा सुरळकर याच्या वडीलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत धम्मा याच्या वडीलांना मोठी दुखापत झाली. धम्माचे वडील अंथरुणाला खिळून पडले.

आपल्या वडीलांना बेदम मारहाण झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळून पडल्याचा राग साहजीकच धम्माच्या मनात होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला 18 फेब्रुवारी रोजी अदखलपात्र गुन्हयाची नोंद घेण्यात आली होती. तेव्हापासून धम्माच्या मनात कैफ बद्दल राग होता. वडीलांना अंथरुणावर पाहिले म्हणजे त्याला कैफची आठवण येवून चिड येत होती.

मयत कैफ

जसजसे दिवस जात होते तसतसे धम्माच्या मनात कैफ विषयी प्रतिशोधाची ज्वाला धगधगत होती. कैफ समोर दिसला म्हणजे त्याला खावू की गिळू असे धम्मा यास होत असे.

त्याने आपल्या मनातील प्रतिशोधाची आग आपले मित्र समीर बांगर, अश्विन बांगर व शुभम खंडेराव यांच्यासमोर कथन केली. काहीही करुन कैफचा बदला घ्यायचा असे धम्माच्या सांगण्यावरुन सर्वांनी ठरवले. त्यासाठी योग्य वेळेची सर्वजण वाट बघत होते. सर्व जण कैफचा बदला घेण्याच्या तयारीला लागले होते.

 दिनांक 11 ऑक्टोबर रोजी कैफचे वडील व भाऊ नेहमीप्रमाणे दिवसभर रस्त्यावर कपडे विकून थकून भागून घरी परत आले. रात्री जेवण आटोपून ते नजीकच्या मदीना मशीदजवळ बसले होते. त्यावेळी धम्मा सुरळकर, समिर उर्फ कल्लु बांगर, आश्विन उर्फ गोलु बांगर, शुभम खंडेराव व त्यांच्यासोबत एक आनोळखी साथीदार असे सर्वजण मोहम्मद कैफच्या दिशेने चाल करुन आले.

काही कळण्याच्या आत त्यांनी मोहम्मद कैफ यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील मुख्य हल्लेखोर धम्मा सुरळकर याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्या रॉडच्या सहाय्याने धम्मा याने मोहम्मद कैफ याच्या डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली.

मोहम्मद कैफ जखमी अवस्थेत पडताच सर्व हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहम्मद कैफ यास तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्याला गोदावरी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. कैफ जागीच ठार झालेला होता.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत व त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटाला, पोलिस नाईक किशोर रघुनाथ महाजन, उमाकांत पन्नालाल पाटील, रमन काशीनाथ सुरळकर, संदीप परदेशी, पो.कॉ. विकास मारोती सातदिवे, प्रशांत रमेश परदेशी, ईश्वर संजय भालेराव, चेतन अरविंद ढाकणे, सचिन चौधरी, सुभाष सावळे, कृष्णा देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवून पुढील कारवाईला सुरुवात केली.

या प्रकरणी मयत मोहम्मद कैफ याचा भाऊ शेख समीर याच्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.नं.882/2020 भा.द.वि. 302, 323, 506, 143, 148, 149 नुसार दाखल करण्यात आला.

या गुन्हांतील आरोपी धम्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर, समीर उर्फ कल्लु अजय बांगर, आश्विन उर्फ गोलु अजय बांगर, शुभंम पंडीत खंडेराव (सर्व रा.पंचशिलनगर भुसावळ) हे गुन्हा करुन भुसावळ शहरातुन बाहेरगावी फरार होत असल्याची गोपनीय माहीती पो.कॉ. विकास मारोती सातदिवे यांना समजली. त्यांनी याबाबतची माहिती लागलीच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या कानावर टाकली.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली 12 ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील खडका चौफुली परीसरातुन चोहो बाजूने सापळा रचून त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना. किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमन सुरळकर, संदीप परदेशी, पो.कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव,चेतन ढाकणे, सचिन चौधरी, सुभाष सावळे, कृष्णा देशमुख यांनी परिश्रम घेतले.

.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here