नाशिक : नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात बनकर चौक भागात एका लहान खोलीत अख्तर परिवार राहतो. अख्तर परिवारातील घरात स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन आज भल्या पहाटे भडका उडाला. या भडक्यात एकाच परिवारातील चौघे जण भाजले. चौघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बनकर चौकातील एका लहानश्या घरातून धूर निघत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्या घरातून जोरजोरात आरडाओरड सुरु होती. या घरात आग लागल्याचा संशय येताच कुणीतरी तात्काळ अग्नीशमन दलाला बोलावून घेतले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी भाजलेल्या चौघांना तात्काळ आणि सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. या दुर्घटनेत अली अख्तर (50), रुबिना अख्तर (45), रमजान अख्तर(28), रुखसाना अख्तर (25) हे एकाच कुटूंबातील चौघे जण भाजले गेले.
अख्तर कुटुंबीय कांदा, लसूण विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरात कांदा, लसूणचे पोते होते. रात्रीच्या वेळी नजरचुकीने घरातील महिलेकडून गॅस शेगडीचे बटन ऑन राहिले. त्यामुळे रात्रभर घरात गॅसची गळती सुरु होती. सकाळच्या वेळी चहा ठेवण्यासाठी गॅस पेटवताच जोरात भडका उडाला व दुर्घटना घडली.








