जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आज भल्या पहाटे गंभीर अपघात झाला. दुचाकी व पलीकडून येणा-या छोटा हत्ती व टाटा मॅजीक यांच्यात झालेल्या धडकेत दांम्पत्य ठार झाले असून एक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातून औद्योगीक वसाहतीच्या दिशेने जाणा-या दुचाकी (एम.एच.19 ए.डब्ल्यू. 7962) ला पलीकडून येणा-या छोटा हत्ती या वाहनाने धडक दिली. पलीकडून येणा-या छोटा हत्ती या वाहनाच्या मागे टाटा मॅजीक हे वाहन येत होते. पुढील छोटा हत्ती या वाहनाचे अचानक ब्रेक लागल्याने मागील टाटा मॅजीक हे वाहन त्यावर आदळले. या अपघातात दुचाकीचालक रामलाल केवट व त्याच्या मागे डबलसीट बसलेली त्यांची पत्नी नेबा केवट हे दोघे ठार झाले.
यावेळी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या गर्दीमुळे अपघात स्थळी अजूनच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वाहतुक सुरळीत केली.
मयत रामलाल केवट याचा भाऊ दीपक केवट हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघे मृतदेह शव विच्छेदनकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. सकाळच्या वेळी एमआयडीसी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर भाजीपाला विक्रेत्यांची भलीमोठी गर्दी असते. ही गर्दी अपघाताला आमंत्रण देणारी असते. किरकोळ अपघात या ठिकाणी नित्याचेच झाले आहे. गर्दीच्या आणि वर्दळीच्या या रस्त्यावर ट्रिपलसिट दुचाकी वाहने अपघाताला आमंत्रण देणारी असतात. या गर्दीला आवर घालणे गरजेचे आहे.