महाराष्ट्रातील सुशांतसिंग राजपूत आत्महत्या की हत्या अशा वादातून इलेक्ट्रॉनिक्स मिडीयात अर्णब गोस्वामीचा “रिपब्लीक भारत” आणि “आज तक” या दोन हिंदी चॅनल्स वरुन चालू असलेले महायुद्ध रंगतदार होत आहे. चॅनल्सच्या आपसी स्पर्धा सुरु असतांना मध्येच टीआरपी घोटाळा बाहेर आला. पोलिस कमिशनर परमबीर सिंग यांनी सुमारे 80 हजारावर बोगस चॅनल्स दर्शकांना कथितरित्या पैसे देवून टीआरपी वाढवण्याचा खेळ प्रकाशात आणला.
याच दरम्यान काहीच आठवड्यापुर्वी घडलेल्या हाथरस येथील दलीत तरुणीच्या सामुहीक बलात्कारासह तिच्या हत्येचे आणि पोलिसांनीच तिचा मृतदेह जाळून टाकण्याचे प्रकरण बाहेर आले व गाजले. त्यात एसआयटी आणि आता सीबीआय पथके सत्य संशोधनार्थ नव्याने खोदकाम करत आहेत. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेश – बिहारसह राजस्थानात आणखी काही बलात्कार प्रकरणे – पुजा-याला जीवंत जाळणे अशा घटना समोर आल्या.
राजस्थानातील जळीत कांडामागे 15 बिघा जमीन प्रकरण होते असे सांगतात. विशेष म्हणजे हाथरस प्रकरणात पिडीता दलीत – वाल्मिकी समाज घटकाची असल्याने संभाव्य मतांच्या राजकारणाने उसळी घेतली. उ.प्र. मुख्यमंत्री योगी उच्च्वर्गीय आणी पिडीत दलीत म्हणून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (कथित आणी व्यथित) तसेच प्रियंका गांधी वाढरा यांच्या हाथरस भेटी प्रसंगी माजलेला गोंधळ जनतेसमोर आहेच.
राजकीय पक्षांचे कुरघोडीचे राजकारण जोरावर असतांनाच टी.व्ही. चॅनल्स वरुन रंगलेल्या डिबेटमधे काही अॅंकर्सनी देखील जातीभेद – द्वेषाचा धुराळा उडवला. त्यात काही लोकप्रतिनिधी – प्रवक्त्यांनी त्यांची मते मांडली. परंतू रिपब्लिक टी.व्ही. आणि आज तक सारख्या चॅनल्सनी परस्परांचे कपडे फाडतांना जी प्रच्छन्न असभ्य शिवीगाळ स्वरुप भाषा वापरली, त्यामुळे जागृत समाजमन असणारे जाहीरातदार जागे झाले.
त्यापैकी राजीव बजाज यांनी द्वेष पसरवणा-या चॅनल्सच्या जाहिराती आताच बंद करत असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ पारले – जी या बिस्कीट निर्मात्या कंपनीने देखील असाच निर्णय जाहीर केला. आता आणखी कोणकोणत्या जाहीरात कंपन्या अशा चॅनल्सवरील जाहीराती रोखणार? असा प्रश्न पुढे आला आहे. उद्योजकांकडून लाखो करोडो रुपयांच्या जाहिरातीचा मलीदा ओरबाडून रिपब्लीक टी. व्ही. व आज तक सह इतर काही चॅनल्सद्वारे वंश – जाती – रंग – वर्णभेद –द्वेषाचा धिंगाणा घातला जात असेल तर त्यांना आम्ही आमचे पैसे (करोडो रुपये ) का द्यावे? हा बजाज आणि पारले – जी चा निर्णय योग्य वाटतो.
क्रिकेटच्या खेळाचे ठराविक जाहिरातदार अब्जावधी उधळतात. काही कंपन्यांचा शेकडो कोटीचा काळा पैसा पांढरा करण्याचा आणखी “गोरखधंदा” या निमीत्ताने चालतो. काही न्युज चॅनल्स त्यांना जाहीरात देणा-यांना आणखी काही टक्के परतावा देतात. म्हणजे 100 कोटीचे न्युज चॅनल्सला वार्षीक पॅकेज दिले तर हा व्यवहार करतांना मधेच एक जाहीरात एजन्सी घुसवून जाहीरातदाराकडून 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचा खेळ देखील रंगतो. सध्या चॅनल्सला टिआरपी दाखवून जाहीरातदार – उद्योजकांकडून लाखो रुपये उपटण्याचा खेळ चालतो.
प्रिंट मिडीयावर जसे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडीयाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे न्युज चॅनल्सवर नियंत्रण नाही का? असे सुप्रीम कोर्ट सरकारला विचारु लगले आहे. न्युज चॅनल्सवर टीआरपी तसा काही वृत्तपत्रांचा आम्हीच नंबर 1 चा खेळ चालतो. त्यात सरकारी अधिका-यांसह सारेच बदमाशीत सामील असतात असे म्हटले जाते.
प्रिंट मिडीयाच्या ऑडीट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या समितीवर एखाद्या प्रिंट मिडीयाच्या पब्लिकेशन हाऊसचा सदस्य का घेतला जातो? सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट व्यवस्थेचा हा खेळ असाच चालू आहे. त्यातही भांगेतील तुळस म्हणून बजाज व पारले – जी सारखे काही उद्योजक सभ्यतेच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
आता महाराष्ट्रातील किती उद्योजक न्युज चॅनल्सच्या शिवीगाळ – भेदाभेद आणि विद्वेषाच्या विरोधात पुढे येतात ते बघायला हवे. बॉलीवुड मधील सुमारे 40 सिने निर्माते दिग्दर्शक अभिनेते कोर्टात धावले आहेत.बॉलीवूडच्या अब्जावधी रुपयांच्या काळ्या पैशावर नजर ठेवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी त्यांच्या राज्यात फिल्मसीटी उभारण्याच्या गोष्टी करताहेत. बॉलीवुड आणि ड्र्ग्जचा हजारो कोटीचा काळा धंदा यातून कुणाकुणाला हफ्ते खायचे आहेत? अशा प्रश्न विचारला जातो.
महाराष्ट्रात किंवा कोणत्याही राज्यातील शहरात जाहीरपणे दुकान – व्यापारी संस्थेची भलीमोठी नेमप्लेट (पाटी ) लावून व्यवसाय करणारांवर इन्कम टॅक्स – ईडी किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा धाडी घालतांना दिसते. तशीच कारवाई बॉलीवूड क्षेत्रात 100 ते 1000 कोटींचा व्यवसाय (धंदा) करणा-या सिने अभिनेते – प्रॉडक्शन हाऊसवर कधी झालेली दिसते काय? चॅनल्सवरील भेदाभेद द्वेषाला बजाज, पारले जी यांचा एक दणका ही सभ्यता रक्षणाची सुरुवात समजून सभ्यतेच्या मार्गाचे आपणही प्रवासी होवूया.
सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव )
8805667750