जळगाव : आज सकाळ पासून वोडाफोन या मोबाईल नेटवर्क कंपनीची सेवा सर्वत्र ठप्प झाली आहे. मोबाईल इन्कमींग आऊट्गोईंग कॉल्ससह इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
पुणे येथून ऑपरेट होणा-या वोडाफोन सेवेची मशिनरी अती पावसामुळे पाण्यात बुडाल्याचे आज जळगाव येथील खाजामिया चौकातील त्यांच्या आउटलेट मधून सांगण्यात आले. याठिकाणी आज सकाळपासून चौकशीकामी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पुणे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मशिनरी पाण्याखाली गेली असल्यामुळे कामकाज ठप्प झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत तांत्रीक अडचण दुर झाल्यानंतर वोडाफोनची सेवा सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसा फलक दर्शनी भागावर लावण्यात आला आहे.
आज सकाळपासून वोडाफोन नेटवर्क बंद झाल्यामुळे सुरुवातीला अनेक ग्राहकांना हा काय प्रकार आहे हे समजलेच नाही. त्यांनी आपला मोबाईल फोन कित्येक वेळा रिस्टार्ट करुन पाहीला. त्यानंतर विविध क्लुप्त्या करुन पाहिल्या. मात्र ज्यावेळी ग्राहक वोडाफोन सेंटर वर गेले त्यावेळी त्यांना खरा प्रकार काय आहे याचा खुलासा झाला.