बुलढाणा : शंकर त्रंबक मालठाणे आणि सुमनबाई मालठाणे हे पती – पत्नी साधारण परिस्थितीत जीवन व्यतीत करणारे दाम्पत्य होते. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापुर तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रुक या गावी ते रहात होते. त्यांच्या संसार वेलीवर राधा आणि शारदा अशा दोन कन्या त्यांना लाभल्या होत्या. पती – पत्नी व दोन मुली असा चौकोनी मालठाणे परिवार पिंपळखुटा या गावी सुखाने नांदत होता.
कॅलेंडरच्या तारखा भराभर बदलत होत्या अर्थात दिवसामागून दिवस जाण्यास वेळ लागत नव्हता. राधा आणि शारदा या दोन्ही मुली बालपणातून तरुणपणात केव्हा आल्या ते मालठाणे दाम्पत्याला समजलेच नाही. असे म्हणतात की मुली लवकर मोठ्या होतात. त्याप्रमाणे कळीच्या रुपातील राधा आणि शारदा यांचे फुलात केव्हा रुपांतर झाले हे शंकर आणि सुमनबाई यांना समजलेच नाही.
राधा आणि शारदा या दोन्ही मुली लग्नायोग्य झाल्या होत्या. त्यांच्या लग्नाची चिंता शंकर आणि सुमनबाई यांना साहजीकच सतावू लागली. मुलगी अठरा वर्षाच्या काठावर आली म्हणजे तिला पालकांचे नव्हे तर पतीचे कुंपनरुपी संरक्षण द्यावे लागते हा समाजाचा एक नियम आहे. ग्रामीण भागात मुलगी अठरा वर्षाची झाली म्हणजे तिचा हात केव्हा एकदा पतीच्या हातात देवू असे पालकांना होत असते. त्याला शंकर आणि सुमनबाई देखील अपवाद नव्हते.
त्यांनी मोठी मुलगी राधा साठी एक स्थळ शोधून आणले व तिचे लग्न आपल्या कुवतीप्रमाणे लावून दिले व तिला सासरी रवाना केले. मात्र मालठाणे परिवाराचे आणि राधाचे देखील दुर्दैव म्हणावे लागेल. लग्नानंतर काही वर्षातच राधाच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे पती निधनानंतर तिने स्वत:ला मानसिक रित्या सावरले. ती पुन्हा आपल्या माहेरी आई वडीलांकडे राहण्यास आली.
दरम्यानच्या काळात मालठाणे परिवाराची दुसरी कन्या शारदा ही देखील लग्नायोग्य झाली होती. त्यामुळे तिच्यासाठी देखील सुयोग्य वर मालठाणे दाम्पत्याने शोधून आणला. लवकरच शारदाचे देखील लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर शारदाला देखील तिच्या सासरी रवाना करण्यात आले. मात्र याठिकाणी देखील राधा प्रमाणेच शारदाचे देखील एक दुर्दैव म्हणावे लागेल. शारदाचे तिच्या पतीसोबत काही जमत नव्हते. त्यामुळे ती देखील पतीला सोडून आपल्या माहेरी आई वडीलांकडे राहण्यास आली.
अशा प्रकारे राधा गेल्या आठ वर्षापासून तर शारदा गेल्या दोन वर्षापासून आपल्या आईवडीलांकडे पिंपळखुटा खुर्द या गावी राहण्यास आली होती. स्वत:सह पत्नी व दोन मुली अशा चार जणांचा संसार आजच्या घडीला महागाईच्या जमान्यात किती अवघड असते याची कल्पना शंकर मालठाणे यांना आली होती. त्यांची अवस्था त्यांची पत्नी सुमनबाई व दोन्ही मुलींना समजत होती. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मालठाणे परिवार गावातील दादाराव म्हैसागर याच्या शेतात मजुरी करण्यासाठी जावू लागले.
मालठाणे यांची मोठी मुलगी राधा ही दिसायला देखणी होती. ती ज्या शेतात कामाला जात होती त्या शेताचा मालक दादाराव म्हैसागर याची पारखी नजर राधावर पडली. त्याच्या नजरेत राधा म्हणजे कोहीनुर हिरा होता. त्याचे राधावर प्रेम बसले व जडले होते.
वास्तवीक दादाराव म्हैसागर हा एक विवाहित होता. त्याला चार मुले होती. चार मुलांचा धनी व बाप असलेला दादाराव हा राधाच्या प्रेमात पडला होता. त्याची चोरटी नजर राधाने हेरली होती. राधा देखील पती निधनापासून पुरुषाच्या शरीर सुखाला पारखी झाली होती. त्यामुळे ती देखील कळत नकळत तारुण्याच्या भरात दादाराव कडे ओढली व खेचली गेली. दादाराव आणि राधा हे दोघे लपुनछपून एकमेकांना भेटू लागले. सुरुवातीला दोघांचा सहवास नंतर हळूच स्पर्शात रुपांतरीत झाला. स्पर्शाचे रुपांतर लवकरच शरीरसुखात परिवर्तीत झाले.
शरीर सुखातून दोघे जिव एकजीव झाले. जगाचे भान त्यांना राहिले नाही. दोघा प्रेमीजणांना जगाचे भान नसले तरी त्या निसर्गला मात्र सर्व जगाचे भान ठेवावे लागते. निसर्ग आपल्या कामात कधी चुक करत नाही असे म्हटले जाते. योग्य वेळ आल्यावर निसर्ग आपली करामत दाखवून देत असतो.
दादाराव सोबत लपूनछपून रात्र घालवणा-या राधाला खुलेआम दिवस केव्हा गेले ते समजलेच नाही. आपल्याला कुणी बघत नाही असा समज करणा-या दादारावकडे त्या निसर्गाचे मात्र योग्य रितीने लक्ष होते. निसर्ग म्हणजे सर्व जगावर लक्ष आणि नियंत्रण ठेवणारा एक भलामोठा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्या कॅमे-याचे आपल्या सर्वांवर लक्ष असते. मांजरीला वाटते की आपण चोरुन लपून दुघ पितो व आपल्याकडे कुणाचे लक्षच नाही. मात्र वेळ आली म्हणजे तिला देखील मार पडतो. दादाराव आणि राधा यांचे प्रेम प्रकरण सा-या गावाला समजले होते. मात्र दोघांना वाटत होते की आपले संबंध कुणाला ठावुक नाही.
एके दिवशी तिला आपल्या पोटातील हालचाली आणि पोटाचा घेर लक्षात आला. आपल्याला दादाराव पासून दिवस गेल्याचे राधाला समजले. तिने हा प्रकार दादारावच्या कानावर घातला. तिचे बोलणे ऐकून दादारावचे कान सुन्न झाले. आता काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. आता त्याला आपली परिवारासह समाजातील इभ्रत आठवली.
त्यातच राधा त्याला वारंवार पोटातील गर्भाचे काय करायचे म्हणून त्रस्त करु लागली. क्षणभराचे सुख त्याला आता महागडे वाटू लागले. तो मनातून पार हादरला होता. तो विवाहीत आणि चार मुलांचा बाप होता. काही दिवस असेच निघून गेले.
14 ऑक्टोबरची पहाट पिंपळखुटा गावातील लोकांसाठी एक दुर्दैवी पहाट म्हणूनच उजाडली. त्या पहाटे मालठाणे परिवारातील सुमनबाई आणि तिच्या दोन्ही मुली बेपत्ता झाल्या असल्याचे त्यांना समजले. आपली पत्नी व दोन्ही मुली कुठेतरी गायब झाल्याचे समजताच शंकर मालठाणे हवालदिल झाले.
ग्रामस्थांनी तिघा मायलेकींचा शोध सुरु केला. दरम्यान सुमनबाई यांचा मृतदेह गाव शिवारातील एका शेतातील हौदात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्यांच्या दोन्ही मुली राधा आणि शारदा या मात्र कुठेही आढळून आल्या नाही. सायंकाळी दोन्ही मुलींचा मृतदेह जवळच असलेल्या एका विहिरीत आढळून आला. गावातील मायलेकींची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.
या प्रकरणी पिंपळखुटा गावाचे पोलिस पाटील शेषराव शालीग्राम उमाळे यांनी बोराखेडी पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा बोराखेडी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 408/2020 कलम 302 नुसार दाखल करण्यात आला.
गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक संदिप पखाले तसेच उप – विभागीय पोलीस अधिकारी (बुलडाणा) रमेश बरकते यांनी आपल्या सहकारी कर्मचायंसह घटनास्थळी भेट दिली. पुढील तपासकामी त्यांनी पोलिस निरिक्षक माधवराव गरुड यांना योग्य त्या सुचना दिल्या.
पोलिस निरिक्षक माधवराव गरुड यांनी आपले सहकारी पोलिस उप निरिक्षक अशोक रोकडे, सहायक फौजदार भगवान पारधी, पो.हे.कॉ. धांडे, आगाशे, खेडेकर, पोलिस नाईक सुनिल जाधव, राजेश हिवाळे, गणेश बरडे, रमेश नरोटे, मंगेश पाटील, सुनिल भवटे, ज्ञानेश्वर धामोडे, महीला पो.कॉ. उज्वला पवार व चालक मुस्तकीम, पोलिस नाईक समीर शेख यांच्या मदतीने पुढील तपासाला गती दिली.
एका गुप्त बातमीदाराने पोलिसांना खबर दिली की गावातील दादाराव अंबादास म्हैसागर याचे मयत सुमनबाईची मुलगी राधा हिच्यासोबत प्रेम संबंध होते. त्याचा या खूनात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या बातमीच्या आधारे त्याला चौकशीकामी पो.नि. माधवराव गरुड यांनी पोलिस स्टेशनला बोलावले.
सुरुवातीला आपल्याला काहीच माहिती नाही असे म्हणणारा दादाराव नंतर पोलिसी खाक्या बघून सत्य कथन करु लागला. तिघी मायलेकींना ठार केल्याची कबुली त्याने दिली. सर्वप्रथम मुलींची आई सुमनबाई व नंतर दोघींना ठार केल्याची कबुली दादाराव याने दिली.
दादाराव यास अटक करण्यात आली. त्याला मलकापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला 20 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास बोराखेडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक माधवराव गरुड व त्यांचे सहकारी करत आहेत.
या तिहेरी खून प्रकरणी दाखल गुन्ह्यात केवळ दादाराव म्हैसागर या एकट्या आरोपीचा सहभाग असू शकत नाही असे म्हटले जात आहे. कारण तिघांचा खुन एकट्या दादाराव कडून होणे शक्य नाही. त्या दृष्टीने तपास सुरु आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.महेंद्र देशमुख व पो.उ.नि. इनामदार यांनी देखील मदत केली.