जळगाव : बॅंक खातेदारांची गोपनीय माहिती मिळवून त्या माहितीच्या आधारे फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने आज ताब्यात घेत अटक केली आहे.
रामानंद नगर पोलिस स्टेशनला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पो.नि. अनिल बडगुजर यांनी आज माहिती दिली. या गुन्ह्याप्रकरणी 4,12,53,27,655 रुपयांची फसवणूक करण्यासाठी बॅंक खातेदारांच्या खात्यांची गोपनीय माहिती मोबाईल द्वारे संशयीत आरोपींनी सायबर एक्स्पर्ट तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे यास दिली असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला पो.नि. अनिल बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 323/20 भा.द.वि. 420, 409, 379, 120 ब, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेला कथीत हॅकर मनीष लिलाधर भंगाळे याच्या संपर्कात या प्रकरणातील संशयीत आरोपी असल्याचे म्हटले जात आहे. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी बॅंक खातेदारांच्या खात्यातील पैसे वळते करण्यासाठी मनीष भंगाळे यास आमिष दाखवून गळ घालत होते असे फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा करत असून इतर संशयीतांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे.