बीड : बीड येथील वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना आज तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बॅंकींग क्षेत्रात खळबळ माजली आहे.
वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन यांच्या परळी येथील निवासस्थानी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. त्या सापळ्यात दहा लाख रुपयांची लाच घेतांना अशोक जैन अडकले.
वैद्यनाथ बँकेने कळंब येथील बँकेच्या एका सभासदाला सुमारे अडीच कोटी रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते असे समजते. त्या कर्ज प्रकरणी चेअरमन अशोक जैन यांनी 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
आज ठरलेल्या 15 लाखांच्या रक्कमेपैकी 10 लाख रुपये आज दुपारी दोन वाजता चेअरमन अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे नियोजन होते. नियोजीत वेळेनुसार तक्रारदार ठरलेली 10 लाख रुपयांची रोकड अशोक जैन यांच्या घरी गेला. त्यावेळी सापळा रचून दबा धरुन बसलेले औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली.
दहा लाख रुपयांची लाच घेतांना अशोक जैन यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. वैद्यनाथ सहकारी बँक भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या अखत्यारीत आहे.