जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील यांनी आज जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला अखेर “त्या” महिलेसह मनोकल्प फिश फार्मचे संचालक मनोज वाणी तसेच त्यांचे अज्ञात साथीदार अशांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली आहे.
अभिषेक पाटील यांचे राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा कट रचल्याप्रकरणी तसेच “त्या” महिलेने अभिषेक पाटील यांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी रितसर कायदेशीर गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.114/20 भा.द.वि. 417, 120 (ब) तसेच 294 नुसार दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 15 ऑक्टोबर रोजी अभिषेक पाटील मुबंई येथून जळगाव येथे परतीच्या प्रवासात असतांना त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका महिलेचा फोन आला. त्या महिलेने त्यांना आपले नाव सांगून परिचय देत म्हटले की मला आपली भेट घ्यायची आहे. त्यावर अभिषेक पाटील यांनी त्या महिलेस म्हटले की मी आता प्रवासात असून उद्या तुम्ही मला भेटायला पक्षाच्या कार्यालयात या.
दुस-या दिवशी 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय बंद आढळल्यामुळे त्या महिलेने चर्चेअंती त्यांची भेट त्यांच्या रिंगरोड येथील कार्यालयात घेतली. त्यावेळी तिने त्यांना खासगीत बोलायचे असे सांगीतल्यामुळे अभिषेक पाटील यांनी त्यांचे परिचीत प्रशांत राजपूत यांना बाहेर बसण्यास सांगितले.
एकांत साधुन त्या महिलेने त्यांना म्हटले की मी बड्या लोकांना शरीर संबंधासाठी मुली पुरवण्याचे काम करते. मला तुमच्याकडे मनोज वाणी यांनी अॅडव्हान्स पैसे देवून पाठवले आहे. एका मुलीसोबत मला तुमचे काही फोटो अथवा व्हिडीओ काढून पाहिजे. असे झाले नाही तर तुमच्याविरुद्ध विनयभंगाचा अथवा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला जाईल. यामुळे तुमचे राजकीय जीवन संपुष्टात येईल.
त्या महिलेने तिच्या ताब्यातील व्हाटस अॅप मधे मनोज पाटील यांनी तिला पाठवलेला अभिषेक पाटील यांचा फोटो व मोबाइल क्रमांक दाखवला. त्यावर अभिषेक पाटील यांनी तिला म्हटले की मी तसा व्यक्ती नाही जसे तुम्ही समजता, आपण येथून निघून जावे. त्यानंतर ती महिला तेथून निघून गेली.
या घटनेमुळे व्यथित झालेल्या अभिषेक पाटील यांनी आज 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला त्या महिलेसह मनोज वाणी व त्यांचे अज्ञात साथीदार अशांविरुद्ध रितसर कायदेशीर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. महेंद्र वाघमारे करत आहेत.