ड्रग्ज निर्मितीचा उद्योग पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आणला उघडकीस

पिंपरी : अमली पदार्थांचे उत्पादन कुठे व कशा रितीने होते याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती लागली आहे. रांजणगाव येथील एका बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जची निर्मीती होवून तयार झालेल्या ड्र्ग्जचा मुंबई मार्गे देशात पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. या निमित्ताने पुन्हा ड्रग्जचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे.

पोलिसांच्या अटकेतील आरोपी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी या तिघांनी डिसेंबर २०१९ मध्ये तुषार सूर्यकांत काळे, किरण राजगुरु, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा व जुबेर मुल्ला या सर्वांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसी परिसरातील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद अवस्थेतील कंपनीत जवळपास १३२ किलो एमडी ड्रग्ज तयार केले होते.

यापैकी ११२ किलो वजनाचे ड्रग्ज तुषार काळे याने नायगाव वसई येथील झुबी उडोको नावाच्या नायजेरियन आरोपीला विक्री केले होते. उर्वरीत २० किलो ड्रग्ज विक्रीसाठी घेवून जात असतांना अक्षय काळे यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शिताफीने सापळा रचून अटक केली.

किरण काळे हा रांजणगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत संचालक आहे. त्याने अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंद गिरी गोसावी, किरण राजगुरु तसेच तुषार काळे या सर्वांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी ड्रग्ज निर्मितीसाठी उपलब्ध करून दिली. एक किलो ड्रग्ज तयार करण्यासाठी ६० हजार रुपये दर ठरवण्यात आला. तुषार काळे याने त्या बदल्यात ६७ लाख रुपये अदा केले. मोठा आर्थिक व्यवहार झालेला असल्यामुळे पोलिसांनी आरोपींची बँक खाती गोठवली आहे.

तुषार काळे याला राकेश खानिवडेकर याने ड्रग्ज तयार करणे, विक्री करणे व रकमेची विल्हेवाट लावण्याकामी मदत केली. राकेश यास यापूर्वी डीआरआयच्या अधिका-यांनी पालघर येथील कंपनीत अमली पदार्थ निर्मीतीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

ड्रग्ज विक्रीतून आलेल्या ८५ लाख रुपयांची रोकड तुषार काळे व राकेश खानिवडेकर यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. तुषार काळे याने स्वत:ची कंपनी टाकण्यासाठी पालसाई, ता. वाडा, जि. पालघर या ठिकाणी ७५ लाख रुपयांची दोन एकर शेतजमीन विकत घेतली आहे. ती मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. तुषार व राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्जची निर्मीती केली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जवळपास २० कोटी ९० लाख २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here