जळगाव: मोबाईल रिपेरिंग करणा-या दुकानदाराने परिचित व्यक्तीकडे ठेवण्यास दिलेल्या मोबाईलची बॅग कुणीतरी अज्ञात चोराने लांबवली होती. याशिवाय घरातील गॅस सिलेंडर व पाण्याची मोटार देखील चोरट्याने चोरुन नेण्याचा प्रकार मेहरुण शिवारातील शेरा चौकात रविवारी घडला होता. या घटनेतील चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. यासोबतच त्याच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात यश मिळवले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की इस्लाम शेख शाकीर शेख हा मजुरी करणारा तरुण मेहरुण परिसरातील शेरा चौकात राहतो. मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला इस्लाम शेख हा मजुरी करण्यासाठी जळगाव शहरात राहण्यास आला आहे.
इस्लाम शेख याचा मोबाईल नादुरुस्त झाला होता. त्याच्या घराजवळ सैय्यद वकार सैय्यद सलिम अली हा राहतो. सैय्यदचे गोलाणी मार्केटमधे मोबाईल रिपेरिंगचे दुकान आहे. लॉक डाऊन सुरु असल्यामुळे त्याचे दुकान बंद आहे. तो घरीच मोबाईल रिपेरिंगची कामे करतो. 21 जून रोजी रात्री आठ वाजता मोबाईल दुरुस्त करण्यासाठी इस्लाम याने सैय्यद यास फोन लावला. त्यावेळी सैय्यद याने इस्लाम यास शेरा चौकात बोलावले. दोघे एकमेकांना भेटल्यावर सैय्यद यास कुणाचातरी महत्वाचा फोन आल्यामुळे त्याने हातातील मोबाईलची बॅग इस्लाम जवळ दिली व तो निघून गेला. जातांना त्याने इस्लाम यास सांगीतले की दुरुस्तीचा मोबाईल व त्याची बॅग सकाळी घरी आणून दे. त्यावेळी मी तुला तुझा मोबाईल दुरुस्त करुन देतो.
दरम्यान रात्री इस्लामच्या पार्टीशनच्या घरात चोरी झाली. या चोरीत त्याच्या घरातील सैय्यद ठेवून गेलेली बॅग ज्यात अनेक मोबाईल होते. याशिवाय घरातील पाण्याची मोटार व गॅस सिलेंडर चोरीला गेले. हा प्रकार इस्लाम यास सकाळी लक्षात आला. या प्रकरणी इस्लाम शेख याने एमआयडीसी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
आज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक इमरान सैय्यद यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे यापुर्वी चोरीचे दोन गुन्हे दाखल असलेल्या वसीम कादीर पटेल या मास्टर कॉलनीमधील चोरट्याचे नाव पुढे आले. पो.नि. विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी आरोपी वसीम कादीर पटेल यास मेहरुण परिसरातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे 12 मोबाईल व भारत गॅस कंपनीचे सिलेंडर व एक टेक्स्मो कंपनीची पाण्याची मोटर असा जवळपास 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.