जळगाव : इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. कालप्रवाहात काही घटनांचे रि-सायकलींग होत असते असे देखील म्हटले जाते. त्यामुळे जळगाव शहर आणि जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सुचकपणे दर्शवण्यात येणारे चारित्र्यहनन जळगावच नव्हे तर महाराष्ट्राच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय व्हावा असे वाटते.
गेल्या आठवड्यात एका “आंटी”ने राष्ट्रवादीचे युवा नेते अभिषेक पाटील यांची भेट घेतली. या भेटीत तिच्या म्हणण्यानुसार ती जळगाव शहरातील बड्या नेत्यांना शरीरसुखासाठी मुली पुरवण्याचे काम करते. अभिषेक पाटील यांच्यावर “हनी ट्रॅप” लावण्यासाठी तिला पाच लाख रुपयांची सुपारी भेटल्याचे देखील तिने उघड केले.
मला तुमच्याकडे मनोज वाणी यांनी अॅडव्हान्स रक्कम देत पाठवले असल्याचे तिने अभिषेक पाटील यांच्याजवळ कबुल केले. तसेच एका मुलीसोबत मला तुमचे काही फोटो, व्हिडीओ काढून हवे असल्याची तिने मागणी केली. जर फोटो अथवा व्हिडीओ दिला नाही तर तुमच्याविरुद्ध विनयभंग अथवा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात यईल व तुमचे राजकीय जीवन संपुष्टात येईल असे तिने सांगितले.
त्या महिलेने तिच्या ताब्यातील मोबाईलच्या व्हाटस-अॅप मधे मनोज पाटील यांनी तिला पाठवलेला अभिषेक पाटील यांचा फोटो व मोबाइल क्रमांक दाखवला. त्यावर अभिषेक पाटील यांनी तिला म्हटले की मी तसा व्यक्ती नाही.
या घटनेनंतर अभिषेक पाटील यांनी 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला त्या महिलेसह मनोज वाणी व त्यांचे अज्ञात साथीदार अशांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महिला आघाडी आणि या घटने बाबत औत्सुक्य वाटणा-यांना या चारित्र्यहननाच्या गोरख धंद्यामागील ख-या सुत्रधाराचा शोध घ्यावासा वाटल्यास नवल नव्हे ! आता कायदा आपले काम करणारच आहे.
जळगावची सध्या नव्या दमाची पोलिस टीम ताकदीने जोरदार खोदकाम करुन गुन्हेगारांचे बकोटे धरण्यात यश मिळवत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील या चतुर खिलाड्यांचे मानगुट ते कसे पकडतात याचे औत्सुक्य तुर्तास बाजूला ठेवूया.
जळगाव सेक्स स्कॅंडल -2 चा ताजा विषय हाताळतांना थोडे सिंहावलोकन आवश्यक ठरते. आपल्या महाराष्ट्रात सुमारे 22 वर्षापुर्वी जळगाव सेक्स स्कॅंडल गाजले होते. इतके की राज्य – देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बीबीसीने देखील वृत्तांकनात सहभाग नोंदवल्याचा इतिहास सांगितला जातो. माध्यम क्षेत्रातील काही धनवान धुर्तांनी हाच मसाला वापरुन पुस्तके प्रकाशित करुन स्वत:ची पाठ थोपटून घेतली. असो. इतकेच नव्हे तर तत्कालीन भाजपा राजकीय नेत्यांनी विधानसभेत सेक्स स्कॅंडलच्या व्हिडीओ कॅसेट्स दाखवल्या होत्या. शिवाय राज्यात महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करुन राजकीय हवा तापवली, राजकीय तवा गरम करुन राजकीय पोळ्या शेकल्या.कॉंग्रेसचे सरकार देखील पाडले व सत्ता मिळवली.
या वास्तवातून पुढे जातांना आता सुमारे 22 वर्षानंतर पुन्हा एकदा जळगाव सेक्स स्कॅंडल पार्ट 2 राजकीय क्षेत्रात आकाराला तर येत नाही ना? अशी आशंका यावी अशा पद्धतीने काही घटना घडत आहेत. काही योगायोग दिसताहेत, त्याचा समाचार नंतर घेता येईल.
गेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाचे दोन वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारास पुन्हा संधी मिळू नये यासाठी संबंधीतांच्या व्हिडीओ क्लिप्स व फोटो सोशल मिडीयावर पद्धतशीरपणे व्हायरल करण्यात आले. परिणामी त्यांचे राजकीय भवितव्य खराब करण्यात आले असे म्हणतात.
परंतु व्हिडीओ क्लिप्स मुळे एखाद्याचे चारित्र्य उघड होत असेल तर त्यातून “चरित्रहीन” असा नवा मुद्दा पुढे येतो. कोणत्याही राजकीय निवडणूकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करतांना जे शेकडो “फंडे” (मार्ग) वापरतात त्यात आता “चरित्रहिन” हे एक प्रभावी हत्यार – शस्त्र म्हणून पुढे येत आहे.
महाराष्ट्राच्या पुणे – नाशिक – मुंबई – जळगाव सारख्या शहरातून “हनी ट्रॅप” चा मुद्दा वेगाने पुढे येतांना दिसतो. “हनी ट्रॅप” च्या जाळ्यात अडकणा-याला काहीशी सहानुभुती समाज मनातून मिळू शकते. तरी देखील “हनी ट्रॅप” मधे अडकायचे की नाही? या प्रश्नाचे उत्तर त्या व्यक्तीच्या चारित्र्य संपन्नतेत लपलेले आहे. जनतेला आपले लोकप्रतीनिधी, राज्यकर्ते हे शुद्धाचरणी, सभ्य – सुसंस्कृत – उच्च विद्याविभुषित तर हवेच. पण ते “चरित्रहिन” नकोच म्हणून “रिजेक्टेड डस्ट बिन” मधे टाकून द्यावेसे वाटतात.
भारतीय जीवन पद्धतीने स्विकारलेली ही समाजनिती आहे, संस्कृती आहे. या पार्श्वभुमीवर जळगाव शहर आणि जिल्ह्यात घडणा-या अलिकडच्या काही घडामोडी काय दर्शवतात? जळगाव शहरात कोल्हे हिल्स, मेहरुन परिसर अशा अनेक भागात बेकायदा देहव्यापार अड्डे उघडकीस आले. त्यापैकी एक अड्डा तर पोलिसाचे घर भाड्याने घेवून चालवला जात होता.
काही वर्षापुर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत जळगाव शहर हद्दीत एका आलीशान हॉटेल – लॉज मधे लब्धप्रतिष्ठितांची वास्तू भाड्याने घेवून सेक्स रॅकेट चालवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे पोलिस खात्यातीलच एक कर्मचारी त्यात सहभागी असल्याचे सांगितले गेले. स्थानिक वृत्तपत्रांनी समाजहितासाठी हे प्रकरण गाजवले. पोलिस प्रशासनात अनेक अधिकारी – कर्मचारी बदली – बढतीवर गेले. या क्षेत्रात 90 टक्के अधिकारी उत्तम प्रशासन करत असले तरी वर वर्णन केलेल्या शेलक्या घटनातून बदनामीचे डाग उसळतात.
अशाच पद्धतीने जामनेर तालुक्याच्या दिशेने अंगुलीनिर्देश करत अश्लील क्लिप्सचे एक प्रकरण गाजवले जात आहे. रा.कॉ. त समाविष्ट झालेले नेते एकनाथराव खडसे यांनी कथित अश्लील क्लिप्स असल्याचा दावा जाहिरपणे केला आहे. त्यामुळे पुन्हा एक वेळा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महिलांचे विनयभंग, बलात्कार, अपहरण अशा गुन्ह्यांचे ओझे मानगुटीवर असणारे साळसुदपणे समाज जीवनात वावरत असतील तर ते चालू द्यायचे का? असा हा कळीचा प्रश्न आहे. स्वत:च्या चारित्र्य संपन्नतेचा डांगोरा पिटतांना इतरांना चारित्र्यहीन म्हणून शिंतोडे उडवण्याचा राजकीय खेळ नवा नाही. हाच “चारित्र्यहननाचा” गोरखधंदा जळगाव सेक्स स्कॅंडल – 2 म्हणून नवा ट्रेंड स्वार्थासाठी कुणी वापरत असेल, तर सरकारी यंत्रणांनी त्यातील बदमाशी आणि बदमाशांविरुद्ध अॅक्शन घ्यावी असे जनतेला वाटते. शेवटी “चारित्र्य” हे शस्र सामाजिक – सांस्कृतीक सभ्यतेसाठी वापरायचे की स्वार्थासाठी ? हे जनतेनेच ठरवायला हवे.
सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव )
8805667750