जळगाव : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार तसेच फसवणूक केल्या प्रकरणी नेवासा येथील पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस उप निरिक्षक समाधान भाटेवाल यांच्यासह त्यांचे वडील वंसत भाटेवाल, भाऊ अरुण भाटेवाल व पप्पू कुमावत यांना देखील संशयीत आरोपींच्या यादीत टाकण्यात आले आहे.
याप्रकरणी उप निरिक्षक समाधान भाटेवाल यांचे वडील वसंत भाटेवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरीत तिघे जण फरार आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील २१ वर्षाच्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार समाधान भाटेवाल यांचा वाढदिवस २९ जुलै २०१८ रोजी होता. त्या दिवशी त्यांनी तरुणीला चाळीसगाव येथे बोलावून घेतले. जहागीरदारवाडी भागातील त्यांच्या मित्राच्या खोलीवर त्यांनी तिला बोलावून लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध निर्माण केले. त्यानंतर देखील वेळोवेळी हा प्रकार झाला. मात्र लग्नास नकार दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने फिर्याद दाखल केली.
पुढील तपास चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मयूर भामरे करत आहेत.